अटलजींच्या आठवणीत शंभर रुपयांचं नाणं जारी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वाजपेयींचे स्मृती नाणं जारी केलं.

& Updated: Dec 24, 2018, 10:10 PM IST
अटलजींच्या आठवणीत शंभर रुपयांचं नाणं जारी  title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या आठवणीत शंभर रुपयाचे नाणं जारी करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वाजपेयींचे स्मृती नाणे जारी केलं. या कार्यक्रमात अटलजींसोबत मोठा काळ व्यतीत करणारे भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, केद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. अटलजींची विचारधारा आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अटलजींनी राजकीय प्रवासातील जास्त काळ विरोधी बाकावर घालवला असून त्यांनी नेहमी राष्ट्र हिताचाच विचार केल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबर चा जन्म दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. वाजपेयींना 2014 मध्ये देशातील सर्वेोच्च नागरी सन्मान भारत रत्नने गौरविण्यात आले होते. 3 वेळा देशाचे पंतप्रधान बनलेले अटलजींचे 16 ऑगस्टला वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.

असे आहे नाणे 

स्मारक नाण्याच्या एका बाजूस भारताचे प्रतिक चिन्ह आहे. यावर अशोक स्तंभ आणि त्याखाली देवनागरी लिपीमध्ये 'सत्यमेव जयते' लिहिले आहे. नाण्यावर देवनागरी लिपिमध्ये भारत आणि रोमन अक्षरामध्ये INDIA असे लिहिले आहे. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजून अटलजींची आकृती आहे.