उपसभापतींच्या 'गांधीगिरी'वर पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले...

लोकशाहीसाठी यापेक्षा चांगला संदेश काय असू शकतो. मी त्यांचे अभिनंदन करु इच्छितो. 

Updated: Sep 22, 2020, 10:11 AM IST
उपसभापतींच्या 'गांधीगिरी'वर पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले... title=

नवी दिल्ली: संसदेच्या प्रांगणात सरकारविरोधात आंदोलनासाठी बसलेल्या खासदारांशी 'चाय डिप्लोमसी' करु पाहणाऱ्या उपासभापती हरिवंश नारायण सिंह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी याच खासदारांनी हरिवंश नारायण सिंह यांच्यावर हल्ला केला, नंतर हेच खासदार त्यांच्याविरोधात आंदोलनासाठी बसले. मात्र, तरीही हरिवंश नारायण सिंह यांनी आज सकाळी आपल्या घरी केलेला चहा या खासदारांना नेऊन दिला. ही कृती हरिवंश नारायण सिंह यांची महानता आणि उदारता दाखवून देणारी आहे. लोकशाहीसाठी यापेक्षा चांगला संदेश काय असू शकतो. मी त्यांचे अभिनंदन करु इच्छितो. अनेक वर्षांपूर्वी बिहारनेच जगाला लोकशाहीचा संदेश दिला. आज त्याच बिहारच्या भूमीतील हरिवंश नारायण सिंह लोकशाहीचे प्रतिनिधी झाले आहेत. ही आनंदाची आणि प्रेरणादायी गोष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रविवारी राज्यसभेत दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती. त्यांनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येत गोंधळ घातला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसेच माईकही उखाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांना निलंबित केले होते. तत्पूर्वी विरोधकांनी उपसभापतींविरोधात अविश्वास ठरावही मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यंकय्या नायडू यांनी हे नियमाविरोधात असल्याचे सांगत ही मागणी फेटाळून लावली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळी हरिवंश सिंह निलंबित खासदारांसाठी चहा घेऊन आल्याने अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सोशल मीडियावर अनेकजण हरिवंश सिंह यांच्या या कृतीचे कौतुक करताना दिसत आहेत.