'बोगीबील पूल म्हणजे लाखो लोकांची लाईफलाईन'

बोगीबील पुलाचे उदघाटन करण्यापूर्वी मोदी यांनी पुलावर जाऊन त्याच्या कामाची पाहणी केली.

Updated: Dec 25, 2018, 06:04 PM IST
'बोगीबील पूल म्हणजे लाखो लोकांची लाईफलाईन' title=

नवी दिल्ली - देशातील सर्वाधिक लांबीच्या रस्ता-रेल्वे पुलाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी आसाममधील डिब्रुगढ येथे करण्यात आले. बोगीबील हा केवळ दोन राज्यांना जोडणारा पूल नसून, लाखो लोकांची लाईफलाईन असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशात आज सुशासन दिवस साजरा केला जात आहे. देशात सुशासन लागू केले जावे, असे अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होते आणि आज देश त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

बोगीबील पुलाचे उदघाटन करण्यापूर्वी मोदी यांनी पुलावर जाऊन त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी काही वेळ त्यांच्या गाडीतून आणि नंतर पुलावरून चालत जात त्यांनी उपस्थितांना अभिवादनही केले. यावेळी तिथे तिनसुकिया-नाहरलगुन इंटरसिटी एक्स्प्रेस उभी होती. या गाडीतील प्रवाशांनाही त्यांनी हात हालवून अभिवादन केले. या पुलाच्या माध्यमातून दोन राज्यांमधील अंतर कमी झाले आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. 

पुलामुळे चीनच्या सीमेवरील तैनात असलेल्या भारतीय लष्कराला सहज वस्तू पोहोचवता येणार आहेत. पूल तयार करताना त्यावरून टी-७२ रणगाडेदेखील सहज जाऊ शकतील, याची काळजी घेण्यात आली होती. ८७६ कोटी रुपये खर्च करुन हा पूल बांधण्यात आला आहे. हा प्रकल्प २०१० मध्ये सुरु झाला होता. २०१५ पर्यंत तो बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. पण यासाठी २ वर्षे अधिक लागली. यामुळे पुलाचा खर्च ९३८ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. याआधी वांद्रे-वरळी सागरी सेतू देशातील सर्वात मोठा पूल होता. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील अंतर कमी झाले आहे. यामुळे लोकांचे चार तास वाचणार आहेत.