मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देणाऱ्या 'त्या' रिक्षावाल्याची मोदींनी घेतली भेट

केवत कुटुंबीयांनी लग्नाची पहिली पत्रिका मोदींना पाठवली होती. 

Updated: Feb 18, 2020, 04:39 PM IST
मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देणाऱ्या 'त्या' रिक्षावाल्याची मोदींनी घेतली भेट title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील एका रिक्षावाल्याची भेट घेतली. मंगल केवत असे या रिक्षावाल्याचे नाव असून त्यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांना आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका पाठवली होती. ही गोष्ट लक्षात ठेवून मोदींनी वाराणसी दौऱ्यावेळी केवत आणि आवर्जून भेट घेतली. 

मंगल केवत हे वाराणसीच्या डोमरी गावातील रहिवासी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गाव दत्तक घेतले होते. १२ फेब्रुवारी रोजी मंगल केवत यांच्या मुलीचे लग्न होते. त्यांनी या लग्नासाठी केवत यांनी दिल्लीला जाऊन मोदींना निमंत्रण दिले होते. यानंतर मोदींनी ८ फेब्रुवारीला केवत कुटुंबीयांना शुभेच्छा देणारे पत्र पाठवले होते. या पत्रात मोदींनी केवत यांच्या मुलीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर मंगल केवत आणि त्यांची पत्नी रेणुदेवी यांनी मोदींना भेटायची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या विनंतीला मान देत पंतप्रधान मोदींनी वाराणसी दौऱ्यावेळी या दाम्पत्याची भेट घेतली. 

गेल्या सहा वर्षांतला पंतप्रधान मोदींचा हा २२ वा वाराणसी दौरा होता. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधानांची वाराणसीला ही दुसरी भेट आहे. चंदौलीच्या पडावमध्ये मोदींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ६३ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. यावेळच्या दौऱ्यात मोदींनी वाराणसीला १२०० कोटी रुपयांच्या योजनांची भेट दिली होती.