'या' राज्याने आणखी २ आठवडे वाढवला लॉकडाऊन, महाराष्ट्रातपण वाढणार का?

 पंजाबमध्ये १७ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. 

Updated: Apr 29, 2020, 06:12 PM IST
'या' राज्याने आणखी २ आठवडे वाढवला लॉकडाऊन, महाराष्ट्रातपण वाढणार का?  title=

चंदीगड : देशावर सध्या कोरोना संकट घोंघावतंय. देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तरीही अनेक राज्यातील कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाही. पंजाब राज्याने लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये १७ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. कोरोना संसर्ग नसलेल्या विभागात दररोज ४ तास शिधा वाटप दुकानं सुरु राहणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यासंदर्भातील घोषणा केली. महाराष्ट्रातील लॉकडाऊन देखील ३ मेनंतर वाढवणार अशी चर्चा आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतायत ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

राज्याने गठीत केलेल्या समितीचा अहवाल आणि समाजातील सर्व वर्गातून मिळालेल्या माहीतीच्या आधार हा निर्णय घेण्यात आल्याचे कॅप्टन सिंह यांनी सांगितले. राज्यात काही काळासाठी हा निर्णय कायम ठेवणं गरजेचं आहे. उद्यापासून सकळी ७ ते ११ पर्यंत नागरिकांना सवलत मिळणार आहे. पण रेड झोन विभागांना यापासून दिलासा नसल्याचेही ते म्हणाले. 

दोन आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन, कोरोना संकट नियंत्रणात आल्यास वाढवलेला लॉकडाऊन अवधी कमी करण्याचा विचार केला जाऊ शकतो अशी माहितीही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली.

रोज सकाळी चार तास शिधा वाटप केंद्र खुली राहतील. यावेळी ५० टक्के कर्मचारीच उपस्थित असतील. रॅशन दुकानांसाठी एक रोटेशनल शेड्यूल्ड बनवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.