मुंबई : एचडी कुमारस्वामी उर्फ कुमारन्ना यांचं नाव सध्या देशभरात चर्चेत आहे. कर्नाटकच्या राजकारणात त्यांना एक नवं नाव मिळालं आहे ते म्हणजे 'किंग'. कारण कर्नाटक निवडणुकीच्या आधी त्यांना किंगमेकर म्हटलं जात होतं पण त्यांनी दावा केला की ते किंगमेकर नाही तर किंग बनणार आहे. भाजपच्या येदियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाचा 55 तासात राजीनामा द्यावा लागला. कुमारस्वामी 23 मेला कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
राधिका आणि कुमारस्वामी यांचा विवाह अनेक वर्ष चर्चेचा विषय बनला होता. दोघांच्या विवाहाची बातमी अनेक वर्ष बाहेरच आली नाही. 2013 मध्ये कुमारस्वामींचा कन्नड फिल्म अभिनेत्रीसोबत विवाहाचा खुलासा झाला. राधिकानेच हा खुलासा केला. हिंदू पर्सनल लॉनुसार हा विवाह चांगलाच वादात सापडला होता. कर्नाटक हायकोर्टात याबाबत याचिका देखील दाखल केली. पण साक्षीदार नसल्याने ही याचिका फेटाळण्यात आली.
कुमारस्वामी आणि राधिका यांच्या लग्नाचा वाद जरी चर्चेत असला तरी संपत्तीच्या बाबतीत राधिकाने कुमारस्वामी य़ांना मागे टाकलं आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार एफिडेविटमध्ये राधिकाची संपत्ती 124 कोटी दाखवण्यात आली आहे. तर कुमारस्वामी यांची संपत्ती 44 कोटी आहे. कुमारस्वामी यांच्या एफिडेविटनुसार ते एक शेतकरी आहेत. राधिका एक एंटरप्रेन्योर आहे. मागच्या निवडणुकीपासून आताच्या निवडणुकीपर्यंत दोघांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
कर्नाटक निवडणुकीत कुमारस्वामी सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून पुढे आहे. हे पहिल्यांदाच होतं कारण राधिकाची संपत्ती त्यांनी त्यांच्या एफिडेविटमध्ये दाखवली होती. 2013 च्या निवडणुकीत राधिकाची संपत्ती दाखवण्यात आली नव्हती. दोघांची एकूण संपत्ती 167 कोटी आहे.
कुमारस्वामी यांची संपत्ती राधिका पेक्षा कमी असली तरी त्यांच्याकडे अनेक कोटींच्या गाड्या आहेत. ज्यामध्ये 8 कोटींची लँबोर्गिनी, 2.5 कोटींची पोर्शे, 3 कोटींची रेंज रोवर आणि 45 लाखांची हम्मर यांचा समावेश आहे.