लज्जास्पद... संकटाच्या काळातही रेल्वे एजंटकडून तिकीटांचा काळाबाजार

कामगारांनी दिल्लीत पुन्हा न येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Updated: May 12, 2020, 12:53 PM IST
लज्जास्पद... संकटाच्या काळातही रेल्वे एजंटकडून तिकीटांचा काळाबाजार title=

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर वाढतोय तर दुसरीकडे सर्वच व्यवसायांना मोठा फटका बसत आहे. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढला. तरी देखील कोरोनाची साखळी तोडण्यात भारताला यश मिळालेलं नाही. अशात मोठे हाल होत आहेत ते म्हणजे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे. लॉकडाउनमध्ये हातात काम नाही परिणामी पैसा नाही. म्हणून या मजुरांनी आपल्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी सरकारने लांब पल्ल्याच्या गाड्या देखील सुरू केल्या आहेत. 

पण या आणीबाणीच्या परिस्थितीत रेल्वे एजंटने तिकीटांचा काळाबाजार सुरू केला आहे.  नवी दिल्लीहून रेल्वे सुटणार असल्यामुळे स्टेशनवर गर्दी सुरू झाली. घरी जाणार असल्यामुळे प्रवाशांच्या चेह-यावर आनंद दिसून येतोय. तर एजंटला दुप्पट पैसे देऊन तिकीट घ्यावं लागत असल्याबद्दल प्रवशांनी नाराजी व्यक्त केलीय. 

रेल्वे एजंट तिकीटांचा काळाबाजार करत आहेत. रेल्वे एजंट दुप्पट किंमत घेवून तिकीट विकत असल्याची तक्रार  प्रवाशांनी झी २४ ताससोबत बोलताना केली आहे.  दीड हजाराचे तिकीट ३५०० रूपयांना दिले जात आहे. ऑनलाईन तिकीटांची बुकिंग बंद होत नसल्यामुळे मजुरांमध्ये नाराजीचं  वातावरण पाहायला मिळत आहे. 

त्याचप्रमाणे घरी जाण्याचा आनंद चेहऱ्यावर असलेल्या या कामगारांनी दिल्लीत पुन्हा न येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काम बंद असल्यामुळे घर भाडं देणं देखील या कामगारांसाठी कठिण होवून बसलं आहे. तरी देखील मिळेल ते काम करण्याची तयारी मजुरांनी दाखवली आहे.