दुपारी 12.15 नंतर शपथ घेतल्यास महागाई कमी होऊन..; ज्योतिषाच्या सल्ल्याने भजनलाल होणार CM

Rajasthan CM Oath Ceremony: भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाल्यानंतर त्यांची थेट मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांची निवड अनेकांसाठी भुवया उंचावणारी ठरली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2023, 02:04 PM IST
दुपारी 12.15 नंतर शपथ घेतल्यास महागाई कमी होऊन..; ज्योतिषाच्या सल्ल्याने भजनलाल होणार CM title=
आज राजस्थानमध्ये होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

Rajasthan CM Oath Ceremony: राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आज पदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा ही या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र मुख्यमंत्री होण्याआधीच भजनलाल शर्मा नको त्या कारणांसाठी चर्चेत आले आहेत. भजनलाल यांचा ज्योतिष शास्त्रावर फारच विश्वास असून त्याचा परिणाम शपथविधीच्या कार्यक्रमावरही दिसून येत आहे. राशी आणि चंद्राच्या मार्गक्रमणावर आधारित वेळ भजनलाल यांनी शपथ घेण्यासाठी निवडली आहे. शपथ घेण्याआधी सध्या भजनलाल मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेत आहेत. सकाळी सकाळीच भजनलाल हे गोविंददेवजी मंदिरमध्ये दर्शनासाठी पोहोचले.

सव्वा बारानंतर शपथ घेतली तर..

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी भजनलाल शर्मा यांनी दुपारी 12.55 ते 1.50 चा कालावधी निवडला आहे. याच कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून दिया कुमार आणि प्रेमचंद बैरवाही शपथ घेणार आहेत. ज्योतिषाच्या सल्ल्याने भजनलाल यांनी दुपारी 12.15 वाजून गेल्यानंतरचा मुहूर्त शपथ घेण्यासाठी निवडला आहे. ज्योतिषाचार्य बंशीलाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचे मुख्यमंत्र्यांच्या राशीमध्ये दुपारी सव्वा बारानंतर स्थिर लग्न कुंभ असेल. लग्न कुंभामध्ये स्व राशीचा शनी असेल. तसेच गुरु हा भाग्य स्थानी असेल. धन आणि संपत्तीच्या स्वामी स्थानी शुक्र असेल. ही स्थिती फार शुभ मानली जाते. या वेळेत शपथ घेतल्यास धन संपत्ती वाढेल, भाग्य मुख्यमंत्र्यांची साथ देईल आणि राज्यातील जनता सुखी राहील असं सांगण्यात आलं आहे.

अडचणी निर्माण होतील असा इशारा

सव्वा बारानंतर शपथ घेतल्यास महागाई कमी होण्यास आणि जनकल्याणाचं कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी फार फायदा होईल असंही सांगण्यात आलं आहे. वाणी स्थानावर राहू असल्याने सरकारमधील वाचाळ नेत्यांच्या विधानांमुळे काही अडचणी निर्माण होतील असा इशाराही देण्यात आला आहे. सूर्य गुरुस्थानी असल्याने षडा अष्टक दोषही अडचणी निर्माण करु शकतो. भाजपाने आपल्या धक्कातंत्राचा वापर करत राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाल्यानंतर त्यांची थेट मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे त्यांची निवड अनेकांसाठी भुवया उंचावणारी ठरली आहे.

सुरक्षित जागेवरुन निवडून आले

दिल्लीहून आलेल्या निरीक्षकांची आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर 12 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदी भजनलाल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भरतपूर येथील रहिवासी भजनलाल शर्मा हे दीर्घकाळापासून भाजपामध्ये कार्यरत आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवायला लावली. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती. सांगानेर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भजनलाल शर्मा विजयी झाले. संघटनेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं असल्याचं बोललं जात आहे.