अभी तो 'पार्टी शुरू हुई है

आगामी विधानसभेच्या सर्वच जागी ते आपले उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे रजनीच्या चाहत्यांनी दिवाळी साजरी केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 1, 2018, 07:34 PM IST
अभी तो 'पार्टी शुरू हुई है title=

चेन्नई : तामीळनाडूच्या राजकारणात एका नव्या वादळाची सुरुवात झाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. आगामी विधानसभेच्या सर्वच जागी ते आपले उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे रजनीच्या चाहत्यांनी दिवाळी साजरी केली आहे.

रजनीकांत यांनी राजकारणात जोरदार एन्ट्री

आपल्या चाहत्यांची उत्सुकता संपवत अखेर रजनीकांत यांनी राजकारणात जोरदार एन्ट्री केली. चेन्नईत चाहत्यांनी खचाखच भरलेल्या राघवेंद्र कल्याण मंडपममध्ये आपल्या राजकारणात प्रवेशाची घोषणा करून तामिळनाडूच्या राजकारणात नवे रंग भरण्यास सुरुवात केली. 

भ्रष्टाचाराच्या साखळी मोडण्याची प्रतिज्ञा

सिनेमाच्या पडद्यावर अशक्यातील अशक्य गोष्टी लिलया साध्य करणाऱ्या रजनीनं तामिळनाडूत भ्रष्टाचाराच्या साखळीत अडकलेली संपूर्ण सिस्टीम मोडून काढण्याची प्रतिज्ञा केलीय. 

राजकारणातील एन्ट्री महत्वपूर्ण

जयललितांचं निधन आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणापासून दूर होत असलेले वयोवृद्ध करुणानिधी, यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी या पार्श्वभूमीवर रजनीकांतची राजकारणातील एन्ट्री महत्वपूर्ण ठरणार आहे. 

वयाच्या ६७ व्या वर्षी नवा रोल साकारण्यासाठी सज्ज

गेली ५० वर्षे तमिळनाडूच्या राजकारणावर तमिळ चित्रपटसृष्टीशी संबंधित अभिनेते, पटकथाकार यांचा दबदबा राहिला आहे. त्यात वयाच्या ६७ व्या वर्षी नवा रोल साकारण्यासाठी सज्ज झालेला रजनीकांत २०२१ मध्ये म्हणजे साडेतीन वर्षांत तामिळनाडूच्या सत्तेपर्यंत पोहचू शकेल का याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

सत्ता स्थापून सत्ता मिळवण्याची अपेक्षा

याआधी अभिनेते एमजी रामचंद्रन यांनी पाच वर्षांत सरकार बनवलं होतं. पण ते द्रमुकशी संबंधित होते आणि आमदारही होते. १९७२ मध्ये पक्षातून काढल्यानंतर त्यांनी पक्ष स्थापन केला आणि सत्ता मिळवली. त्यांच्या वारसदार ठरलेल्या अभिनेत्री जयललितांनीही सत्तेवर येण्याआधी ८ वर्षे पक्षाचं काम केलं होतं. 

द्रमुकला पाठिंबा जाहीर केला होता

गेली २० वर्षे राजकारणात येणार असं सांगणाऱ्या रजनीकांत यांनी याआधी करुणानिधींच्या द्रमुकला पाठिंबा जाहीर केला होता. तर कधी काँग्रेसला कधी तर कधी भाजपला मतदान करण्याचंही आवाहन केलं होतं. पण प्रत्येकवेळी त्यांना रजनीच्या पाठिंब्याचा फायदा झालाच असं नाही. 

प्रत्येक गाव आणि गल्ली पिंजून काढणार

एकीकडे अभिनेते कमल हसन यांनीही राजकारणात प्रवेशाचे संकेत देऊन तामिळनाडूचा दौरा करण्याची घोषणा केली असताना आता रजनीकांत यांनीही तामिळनाडूचं प्रत्येक गाव आणि गल्ली पिंजून काढणार असल्याचं सांगितलंय. 

रजनीकांतवर प्रेम करणारी तामिळ जनता

अभिनेता म्हणून रजनीकांतवर प्रेम करणारी तामिळ त्यांना राजकीय नेते म्हणून स्वीकारेल का ? हा देखिल औत्सुक्याचा मुद्दा आहे. मूळ कर्नाटकातील असलेल्या जयललितांना तमिळ जनतेनं अम्मा म्हणून स्वीकारलं. 

मूळचा मराठी शिवाजीराव गायकवाड अर्थात रजनीकांत

कर्नाटकातीलच असलेल्या मूळचा मराठी शिवाजीराव गायकवाड अर्थात रजनीकांत यांना तमिळ जनतेनं स्वीकारलं तर थलैवा अर्थात मोठा भाऊ तामिळनाडूवर राज्य करू शकेल. बंगलोरमध्ये १२ मार्च १९५० रोजी जन्मलेल्या रजनीनं घरच्या परिस्थितीमुळे अगदी हमाल म्हणूनही काम केलंय. 

कंडक्टर ते यशस्वी अभिनेता

पुढे कंडक्टर म्हणून काम करत असलेला शिवाजीराव गायकवाड कन्नड नाटकात व्हिलनची भूमिका करू लागला आणि पाहता पाहता नायकही बनला. 

दिग्दर्शक बालचंद्र यांनी त्यांना तमिळ शिकायला सांगितलं, आणि पुढे तमिळ चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोहिनी घातली. 

राजकारणात तो इतिहास घडवेल

गेली ४४ वर्षे तमिळनाडूमध्ये राहणारा रजनीकांत पडद्यावर जसा दंतकथा बनून गेला.अशीच कामगिरी राजकारणात केली तर तामिळनाडूच्या राजकारणात तो इतिहास घडवेल यात शंका नाही.