काँग्रेस कार्यकर्त्यांकडून 'राहुल गांधी अमर रहें'च्या घोषणा! राजीव गांधींच्या श्रद्धांजली सभेतला Video Viral

Rajiv Gandhi Birth Anniversary Viral Video: काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमादरम्यान स्थानिक नेते राजीव गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत असतानाच नेत्यांच्या मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 22, 2023, 09:11 AM IST
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून 'राहुल गांधी अमर रहें'च्या घोषणा! राजीव गांधींच्या श्रद्धांजली सभेतला Video Viral title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसत आहे

Rajiv Gandhi Birth Anniversary Viral Video: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्ट रोजी देशभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. अनेक ठिकाणी राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमधील जोधपूर जिल्हा काँग्रेस कमेटीनेही काँग्रेसच्या कार्यालयामध्ये श्रद्धांजली सभा आणि विशे। कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये राजस्थान काँग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गहलोत, पशुधन बोर्डाचे अध्यक्ष राजेंद्र सोलंकी, आमदार आणि माहापौरांसहीत पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात उत्साहाच्या भरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भलत्याच घोषणा दिल्या. 

नक्की घडलं काय?

झालं असं की, श्रद्धांजली वाहण्याच्या या कार्यक्रमामध्ये राजीव गांधींच्या फोटोला फुलांचा हार घालण्यासाठी काँग्रेसचे नेते पुढे आले. काँग्रेसचे स्थानिक नेते राजीव गांधींच्या फोटोला हार घालत असतानाच कार्यालयात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी चुकून, "राजीव गांधी अमर रहें"च्या घोषणा देण्याऐवजी "राहुल गांधी अमेर रहें"च्या घोषमा दिल्या. कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा फारच चुकल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना घोषणा देण्यापासून रोखलं. कार्यकर्त्यांनाही आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली चूक सुधारत "राजीव गांधी अमर रहें"च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कंप्युटर, मोबाईल राजीव गांधींमुळेच

राजीव गांधींच्या फोटोला फुलांची माळ अर्पण केल्यानंतर वैभव गहलोत यांनी आपल्या भाषणामध्ये, "राजीव गांधींनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडवली. आज आपण कंप्युटर, मोबाईल घरोघरी वापरतो ही त्यांचीच देणगी आहे. राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होत आहोत. राजीव गांधींनीच आधुनिक भारताचा पाया रचला. त्यांनी तरुणांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. माहिती आणि प्रौद्योगिक क्षेत्रातील क्रांती घडवण्याचं काम त्यांच्याच नेतृत्वाखाली झालं," असं म्हटलं.

राहुल गांधींनी लडाख दौऱ्यावर असताना वाहिली श्रद्धांजली

20 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसने रविवारी सद्भावना दिवस साजरा केला. सोनिया गांधी, प्रियंका गांधी वढेरा यांनी दिल्लीमध्ये राजीव गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर राहुल गांधींनी लडाखमधील पँगगाँग तलावाच्या काठी आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. "लडाख हा जगातील सर्वात सुंदर प्रदेशांपैकी एक आहे असं माझे वडील सांगायचे," अशा कॅप्शनसहीत राहुल गांधींनी लडाख दौऱ्यावर जात असल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केले होते.