शबरीमाला मंदिरात जाणाऱ्या महिलांना मिळणार 'या' सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे देशभरात मोठे वादळ निर्माण झाले होते.

Updated: Oct 1, 2018, 03:57 PM IST
शबरीमाला मंदिरात जाणाऱ्या महिलांना मिळणार 'या' सुविधा; सरकारचा मोठा निर्णय title=

कोची: केरळच्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता राज्य सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता शबरीमाला मंदिरात येणाऱ्या महिलांना विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांच्या स्नानासाठी स्वतंत्र आणि प्रशस्त घाट, मंदिरात जाण्याच्या मार्गावर दिव्यांची सोय, बसमध्ये महिलांसाठी विशेष आसने आणि महिलांच्या गरजेनुसार शौचालये, अशा सुविधांचा समावेश असेल. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर केरळ सरकारने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे देशभरात मोठे वादळ निर्माण झाले होते. अनेकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. मात्र, केरळमधील पुरोगामी घटकांनी न्यायालयाच्या या निर्णयाची प्रशंसा केली होती. 

या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या उपस्थित मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शबरीमाला मंदिरातील आगामी उत्सवांच्यादृष्टीने व्यवस्थापन करण्याविषयी चर्चा करण्यात आली. थुलमच्या महिन्यात आणि मंडलम उत्सवासाठी शबरीमाला मंदिरात लाखो भाविक येतात. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंदिरात येणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.