...जेव्हा 'वॉशरुम' वापरण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली राधे माँ!

वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ अचानक दिल्लीतल्या पोलीस स्टेशनमध्ये प्रकट झाली... आणि पोलीस अधिकाऱ्यांचीही एकच धावपळ उडालेली पाहायला मिळाली.

Updated: Oct 5, 2017, 08:57 PM IST
...जेव्हा 'वॉशरुम' वापरण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली राधे माँ! title=

नवी दिल्ली : वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ अचानक दिल्लीतल्या पोलीस स्टेशनमध्ये प्रकट झाली... आणि पोलीस अधिकाऱ्यांचीही एकच धावपळ उडालेली पाहायला मिळाली.

पोलिसांच्या खुर्चीवर आरुढ

दसऱ्याच्या रात्री उशीरा राधे माँ विवेक विहार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली... इथं ती चक्क एसएचओ (Station House Officer) च्या खुर्चीवर आरुढ झाली... आणि तिचा हाच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळतोय. 

या फोटोमध्ये खुद्द विवेक विहार एसएचओ संजय शर्मा हात जोडून, लाल ओढणी गळ्यात टाकून राधे माँसमोर उभे असलेले दिसतायत... त्यांच्या टेबलावर गुलाबाच्या पाकळ्या पडलेल्या दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी नतमस्तक होऊन तिचं स्वागत केलं.

अधिकाऱ्यांची गोची

हा फोटो समोर आल्यानंतर मात्र पोलिसांची पाचावर धारण बसलीय. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एसएचओचं वागणं अव्यवहारिक आणि आक्षेपार्ह आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, यावर स्पष्टीकरण देताना एसएचओनं आणखीन वेगळंच कारण समोर केलंय. एसएचओच्या म्हणण्यानुसार, राधे माँ पोलीस स्टेशनमध्ये वॉशरुमचा वापर करण्यासाठी दाखल झाली होती. त्यांच्या मागे त्यांचे १५-२० भक्तही होते... त्यामुळे औपचारिकता दाखवत त्यांना बसण्यासाठी सांगण्यात आलंय. परंतु, एसएचओच्या खुर्चीवरच त्या का विराजमान झाल्या? याचं उत्तर मात्र त्यांना देता आलं नाही.