'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'

Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 22, 2024, 04:33 PM IST
'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..' title=
स्वाती मालीवाल यांचे गंभीर दावे

Swati Maliwal Assault AAP Plot: आम आदमी पार्टी म्हणजेच 'आप'च्या राजस्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणासंदर्भातील वाद दिवसोंदिवस चिघळत चालला आहे. एकीकडे मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा स्वकीय सचिव विभव कुमार यांच्या मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी विभव यांना पोलिसांनी अटक केली असून तपास सुरु आहे. असं असतानाच दुसरीकडे स्वाती मालीवाल यांनी 'आप'वर सातत्याने आरोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता त्यांनी सोशल मीडियावरुन 'आप'संदर्भात काही गंभीर आरोप केले आहेत. 'आप'च्या नेत्यांवर माझ्याविरोधात घाणेरडी विधान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. 

सगळ्यांना वेगवेगळी कामं दिल्याचा दावा

स्वाती मालीवाल यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केलं आहे. "जे तिला पाठिंबा देणार तिला पक्षातून काढलं जाईल असं बोललं जात आहे. कोणावर पत्रकार परिषद घेण्याची तर कोणावर ट्वीट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काहींना अमेरिकेत बसलेल्या स्वयंसेवकांना फोन करुन माझ्याविरोधात काहीतरी माहिती काढण्याची जबाबदारी दिली आहे. आरोपीच्या निकटवर्तीय पत्रकरांना काहीतरी खोटं स्टिंग ऑप्रेशन करुन रेकॉर्डींग मिळवण्याची जबाबदारी दिली आहे," असा दावा मालीवाल यांनी केला आहे.

खासगी फोटो लीक करुन...

"काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे सर्वजण दबावामध्ये आङेत. स्वातीविरुद्ध घाणेरड्या गोष्टी बोला, त्यांचे खासगी फोटो लीक करुन तिचं मानसिक खच्चीकरण करा, असं सांगितलं जात आहे," असं मलीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मी लढत राहणार

स्वाती मालीवाल यांनी पुढे, "तुम्ही हजारो लोकांची फौज उभी करा. मी एकटी सामना करण्यासाठी तयार आहे कारण सत्य माझ्यासोबत आहे. माझ्या मनात या लोकांबद्दल कोणतीही नाराजी नाही. आरोपी फार ताकदवान व्यक्ती आहे. मोठ्यात मोठा नेताही त्याला घाबरतो. त्याच्याविरोधात भूमिका घेण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. मला कोणाकडून तशी अपेक्षाही नाही. वाईट या गोष्टीचं वाटत आहे की दिल्लीची एख महिला मंत्री कशाप्रकारे हसत पक्षाच्या एका माजी महिला सहकाऱ्याचं चारित्र्यहनन करत आहे. मी माझ्या स्वाभिमानासाठी लढाई सुरु केली आहे. न्याय मिळेपर्यंत मी लढत राहणार आहे. या लढाईत मी पूर्णपणे एकटीच आहे, मात्र मी पराभव स्वीकारणार नाही," असंही म्हटलं आहे.

'...तर माझ्याबरोबर हे असं होऊ दिलं नसतं'

एकेकाळी आम्ही सर्वजण निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो. आज 12 वर्षानंतर अशा आरोपीला वाचवण्यासाठी आपण रस्त्यावर उरतलो आहोत ज्याने सीसीटीव्ही फुटेज गायब केलं आहे आणि फोन फॉरमॅट केला आहे, असं मालीवाल यांनी यापूर्वी म्हटलं आहे. एवढाच जोरा मनीष सिसोदियांसाठी लावला असता तर त्यांनी हा असा प्रकार माझ्याविरुद्ध होऊ दिला नसता, असंही मालीवाल यांनी म्हटलं आहे.