'प्रेम असेल तर पाठवा पिझ्झा,' Valentine Day ला तरुणीच्या मेसेजनंतर Swiggy ने काय केलं पाहा

'व्हॅलेंटाइन डे'ला तरुणीने ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विग्गीकडे एक विनंती केली होती. स्विगीने यानंतर तिला सरप्राइज देत आश्चर्याचा धक्का दिला.   

शिवराज यादव | Updated: Feb 16, 2024, 12:10 PM IST
'प्रेम असेल तर पाठवा पिझ्झा,' Valentine Day ला तरुणीच्या मेसेजनंतर Swiggy ने काय केलं पाहा title=

Trending News: बुधवारी संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला. जगभरातील प्रेमी युगूलांनी आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करत पुन्हा एकदा प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. प्रेमाचा हा दिवस साजरा करताना प्रियकर, प्रेयसी एकमेकांना गिफ्ट देत तो क्षण जगत असतात. दुसरीकडे या दिवसाचा फायदा घेणाऱ्यांचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच कपल्ससाठी वेगळ्या ऑफर, डिस्काऊंट जाहीर केले जातात. अनेक अॅप्सवरुन युजर्सना मोबाइल नोटिफिकेशन पाठवत ऑफरची माहिती देण्यात आली.

फूड डिलिव्हरी अॅप स्विगीनेही व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने युजर्सना ऑफर दिली होती. पण यादरम्यान त्यांनी आपल्या एका ग्राहकाला व्हॅलेंटाइन डेला सुंदर भेट पाठवून दिली. स्विगीच्या या कृत्याचं कौतुक केलं जात आहे. 

झालं असं की, स्विगीने इतर ग्राहकांप्रमाणे सुश्मिता नावाच्या तरुणीलाही नोटिफिकेशन पाठवलं होतं. यामध्ये लिहिण्यात आलं होतं की, 'सुश्मिता, तुझं व्हॅलेंटाइन फक्त सर्वोत्तम मिळण्यासाठीच पात्र आहे. सुदैवाने त्यांच्याकडे तू आहेस'. 

सुश्मिताने या नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट घेऊन ट्विटरला शेअर केला. यानंतर तिने स्विगीला टॅग करत लिहिलं की, "माझा कोणीही व्हॅलेंटाइन नाही. असे मेसेज तुम्ही का पाठवता?". याचं उत्तर देताना स्विगीने सांगितलं की, 'जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमचे व्हॅलेंटाइन होऊ शकतो'. त्यावर सुश्मिताने सांगितलं की, 'प्रेम असेल तर चीज बर्स्ट पिझ्झा पाठवा'. आश्चर्याची बाब म्हणजे स्विगीने याचं उत्तर देत आम्हाला तुमच्या डिटेल्स पाठवा सांगितलं. 

यानंतर सुश्मिताने ह्रदयाच्या आकारातील पिझ्झाचा फोटो शेअर केला. यासह दोन गुलाब आणि एक पत्रही होतं. या पत्रात लिहिण्यात आलं होतं की, "You deserve all the love and pizza, trust us. Love Swiggy." 

फोटोच्या कॅप्शनमध्ये सुश्मिताने लिहिलं आहे की, मला खरंच पिझ्झा पाठवला यावर विश्वासच बसत नाही आहे.

दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी स्विगीचं कौतुक केलं असून, कमेंट्सचा पाऊसच पडला आहे.