आता ट्रेनमध्ये ऑर्डर करा आवडत्या हॉटेलचं जेवण, भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा

IRCTC-Swiggy : आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही आपले आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार आहेत. IRCTC ने Swiggyबरोबर पार्टनरशिप केली आहे. सुरुवातीला चार स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु केली जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 23, 2024, 07:17 PM IST
आता ट्रेनमध्ये ऑर्डर करा आवडत्या हॉटेलचं जेवण, भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा title=
संग्रहित फोटो

IRCTC-Swiggy : मोबाईलच्या जमान्यात ऑनलाईन फूड मागवण्याची संख्या प्रचंड वाढली आहे. घरबसल्या आपल्याला हव्या त्या रेस्टॉरेंटमधून हवी ती डिश ऑर्डर करता येते. पण आता धावत्या ट्रेनमध्येही आपल्या जागेवर बसल्या-बसल्या तुम्हाला तुमचे आवडते खाद्यपदार्थ (Food) मागवता येणार आहे. फूड डिलिव्हरी अॅप Swiggy भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवणार आहे. स्विगी आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनबरोबर भागिदारी केली आहे. प्रवाशांपर्यंत जेवण पोहोचवणं हा यामागे उद्देश आहे. यासाठी प्रवाशांना एका पोर्टलची मदत घ्यावी लागणार आहे. 

IRCTC ने बंडल टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडबरोबर भागिदारी केली आहे. यात IRCTC च्या ई-कॅटरिंग पोर्टलच्या माध्यमातून प्री-ऑर्डर केलेल्या प्रवाशांना जेवण दिलं जाणार आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये ही सेवा सुरु केली जाणार आहे. 

या स्टेशनपासून सुरुवात
सुरुवातीला ही सेवा काही मोजक्या रेल्वे स्थानकांपुरता मर्यादित असणार आहे. यात बंगळुरु, भूवनेश्वर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. IRCTC ने याची घोषणा केली आहे. या भागिदारामुळे प्रवाशांना ट्रेनमधून प्रवास करताना चांगल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. 

Zomatoबरोबरही भागिदारी
याआधी IRCTC ने Zomato बरोबरही भागिदारी केली आहे. झोमॅटोच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्थानकावर प्री ऑर्डर फूड डिलिव्हरी सेवा दिली जाते. 

IRCTC e-catering पोर्टल कसं काम करतं?
IRCTC e-catering पोर्टलच्या माध्यमातून प्रवाशी प्रवासादरम्यान आपल्याला हवा तो खाद्यपदार्थ मागवू शकतात. संबंधित पोर्टल उघडल्यानंतर त्यात प्रवाशाला आपला PNR नंबर टाकायचा आहे. यानंतर रेस्टोरंटची यादी तुमच्यासमोर येईल. यातलं एक रेस्टोरंट निवडमून त्याली खाद्यपदार्थ तुम्ही ऑर्डर करु शकता. यात ऑनलाईन किंवा कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायही प्रवाशांना देण्यात आला आहे. 

व्हॉट्सअॅपवरुन जेवण बूक करा
याआधी भारतीय रेल्वेने एक व्हॉट्सअॅप नबंर जारी केला होता. 8750001323 या नंबरवरुन जेवण बूक करण्याची सुविधा सुरु केली आहे. यामध्ये तुम्ही ट्रेनमध्येच Online जेवण मागवू शकता. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्ही जेवणाची ऑर्डर देऊ शकता. आयआरसीटीसीची ही नवीन सुविधा आहे. रेल्वेच्या ई-कॅटरिंग सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना एका दिवसात जवळपास 50 हजार जणांना जेवण पुरवते. त्यासाठी तुम्ही IRCTCच्या वेबसाईट आणि अॅपवरुन बुक करु शकता. रेल्वे प्रवाशाला IRCTC च्या ई-कॅटरिंग वेबसाइटद्वारे स्थानकांवर उपलब्ध असलेल्या त्याच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून थेट जेवण ऑर्डर करण्याची सुविधा दिली जाते.