असं एक रहस्यमयी मंदिर, जिथे सकाळी भाविकांना पहायला मिळतो असा चमत्कार की...!

असं मानलं जातं की, भगवान शिव आणि माता पार्वती या ठिकाणी येतात, विश्रांती घेतात

Updated: Jul 29, 2022, 01:39 PM IST
असं एक रहस्यमयी मंदिर, जिथे सकाळी भाविकांना पहायला मिळतो असा चमत्कार की...! title=

मुंबई : भारतात अनेक रहस्यमय आणि चमत्कारी मंदिरं आहेत. त्यांचे रहस्य पाहून लोक आश्चर्यचकित होतात. असंच एक चमत्कारिक मंदिर आहे, ज्याबद्दल असं मानलं जातं की, भगवान शिव आणि माता पार्वती या ठिकाणी येतात, विश्रांती घेतात आणि सारीपाट खेळतात. हे मंदिर म्हणजे खांडव्याचं ओंकारेश्वर मंदिर.

भगवान शिव यांचं हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी चौथं ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर मंदिर मध्य प्रदेशातील इंदूर शहराजवळ आहे. नर्मदा नदीच्या मध्यभागी ओंकार पर्वतावर वसलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे.

ओंकार पर्वतावर वसलेले

भगवान शिवाचे हे चमत्कारी मंदिर मध्य प्रदेशातील निमारमध्ये आहे. हे खंडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या मध्यभागी ओंकार पर्वतावर वसलेलं आहे. असं मानलं जातं की, या ठिकाणी ओम शब्दाची उत्पत्ती ब्रह्माजींच्या श्रीमुखापासून झाली आहे. म्हणून प्रत्येक धर्मग्रंथ किंवा वेद हे ओम शब्दाने पाठ केले जातात.

ओंकारेश्वराचा महिमा पुराणात स्कंद पुराण, शिव पुराण आणि वायु पुराणातही सांगितलेला आहे. शिवाय इथल्या शिवलिंगाचा आकार ओमच्या आकारात आहे. म्हणूनच हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर म्हणून ओळखलं जातं.

रात्री सारीपाट खेळतात देव

असं मानलं जातं की, हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे, जिथे भगवान भोलेनाथ रात्री विश्रांतीसाठी येतात. माता पार्वतीही इथे विराजमान आहे. भगवान शिव आणि माता पार्वती झोपण्यापूर्वी चौसर खेळतात. या कारणास्तव याठिकाणी शयन आरती देखील केली जाते. शयन आरतीनंतर ज्योतिर्लिंगासमोर दररोज चौसरचा पट सजवला जातो.

या मंदिरात रात्रीच्या आरतीनंतर कोणीही आतील बाजूला जात नाही. दररोज रात्री शयन आरतीनंतर भगवान शंकरासमोर चौसर आणि फासे ठेवले जातात. सकाळी मंदिराचे दरवाजे उघडले असता फासे उलटे पडलेले आढळतात. ओंकारेश्वर मंदिरात भगवान शिवाची गुप्त आरती केली जाते जिथे पुजारी सोडून कोणीही गर्भगृहात प्रवेश करू शकत नाही. पुजारी भगवान शिवाची विशेष पूजा आणि अभिषेक करतात.