'मोदींचा देव त्यांचे रक्षण करू शकत नाही, कारण..'; 5 राज्यांतील निकालाआधीच राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Before Assembly Election 2023 Result: कोणताही महापुरुष देवाच्या दारात ध्यानमग्न बसला म्हणून 41 मजुरांचे प्राण वाचले नाहीत. यंत्र, विज्ञान आणि मनुष्याला शक्ती लावून बोगद्यातले दगड फोडून रस्ता करावा लागला, असं राऊत म्हणाले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 3, 2023, 07:21 AM IST
'मोदींचा देव त्यांचे रक्षण करू शकत नाही, कारण..'; 5 राज्यांतील निकालाआधीच राऊतांचा हल्लाबोल title=
मोदींच्या पुरातन मार्गाने जायचे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही राऊत म्हणालेत

Sanjay Raut On PM Modi Before Assembly Election 2023 Result: मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम, तेलंगण आणि छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर होणार आहे. हे निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी-फायनल समजली आहे. असं असतानाच निडवणुकींचे निकाल लागण्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. "पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज लागतील. निवडणुकांत यश मिळावे म्हणून आपले पंतप्रधान शेवटी धर्म आणि देवळांनाच शरण गेले. बेरोजगारी, महागाई यामुळे लोक बेजार झाले आहेत. घंटा, थाळ्या वाजवून ‘कोरोना’ पळाला नाही, तसा लडाखमध्ये घुसलेला चीन पळणार नाही. महागाई कमी होणार नाही. पंतप्रधान मोदी हे युगपुरुष आहेत, असे आपले उपराष्ट्रपती म्हणतात. देशाला चांगल्या पुरुषाची गरज आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शहरांची नावं बदलल्याने गरिबी संपली का?

"संध्याकाळपर्यंत पाच राज्ये ‘2024’ चे देशाचे भविष्य ठरवतील. तेलंगणाचे मतदान सगळ्यात शेवटी म्हणजे 30 तारखेला झाले.  तेलंगणात भाजप कोठेच नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हैदराबादेत प्रचारास गेले व त्यांनी जाहीर केले की, तेलंगणात आमचे सरकार आले तर हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू. हैदराबादचे ‘भाग्यनगर’ केल्याने देशाचे व जनतेचे कोणते प्रश्न सुटणार? भाजप म्हणजे देशातील शहरे व रस्त्यांची नावे बदलणारा कारखाना झाला आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, फैजाबादसह अनेक जिह्यांची नावे योगींनी बदलली, पण प्रदेशातील गरिबी, बेरोजगारी त्यामुळे संपली नाही," असा टोला संजय राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोख'मधून लगावला आहे.

हैदराबाद हे विजयाचे प्रतीक

"टिपू सुलतानविषयी सध्याच्या हिंदुत्ववादी लोकांचे मत टोकाचे आहे, पण टिपूची तलवार ही ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध तळपली होती. टिपू म्हैसूर साम्राज्याचा शासक होता व त्याची राजधानी श्रीरंगपट्टनम होती. टिपूने श्रीरंगपट्टनमचे नाव बदलले नाही. टिपू हा धर्मांध होता व त्याच्या राजवटीत धर्मांतरे झाली, पण श्रीरंगपट्टनमचे नामांतर त्याने केले नाही. महाराष्ट्रात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर होणे लटकून पडले आहे. गुजरातमध्ये अहमदाबादचे कर्णावती होऊ शकले नाही व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज हैदराबादेत जाऊन त्या शहराचे नाव बदलू पाहत आहेत. हैदराबादच्या निजामाला स्वतंत्र भारतात विलीन व्हायचे नव्हते, पण सरदार पटेल यांनी पोलीस अॅक्शन घेतली व हैदराबादेतच निजामास शरण यावे लागले. हैदराबाद हे विजयाचे प्रतीक आहे. ते तसेच राहिले पाहिजे," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

विकासाचा मुद्दा कोठेच नाही...

"तेलंगणाच्या प्रचारास जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे बालाजी तिरुपतीच्या मंदिरात पोहोचले. कपाळास चंदन, भस्म लावून ते मंदिरात पूजा-अर्चा करीत असल्याचे चित्र सर्वत्र झळकले. हा प्रचाराचाच एक भाग झाला. त्याआधी ते मथुरेत जाऊन कृष्णचरणी लीन झाले. त्यात श्रद्धा कमी व प्रसिद्धी, प्रचार जास्त. पाच राज्यांतील निवडणुका सरकारच्या कामांवर, विकासाच्या मुद्द्यावर नाही, तर सरळसरळ जातीय, धार्मिक, ध्रुवीकरण करून लढवल्या जात आहेत, पण आपला निवडणूक आयोगही भाजपच्या गाभाऱ्यात डोळे मिटून ध्यानस्थ बसला आहे. त्यात आता 22 जानेवारीला पंतप्रधान मोदी हे अयोध्येत जाऊन राममंदिराचे लोकार्पण करणार. म्हणजे 2024 च्या भाजप प्रचाराचा आणखी एक उत्सव देशभरात साजरा होईल. राममंदिराच्या अक्षता देशातील घराघरांत पोहोचवून 2024 च्या प्रचाराचा मुहूर्त साधला जाईल. शेवटी देशापेक्षा धर्म महत्त्वाचा व त्याच धर्माची ढाल पुढे करून पंतप्रधान मोदी पुन: पुन्हा निवडणुकांना सामोरे जात आहेत. विकासाचा मुद्दा कोठेच नाही," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या पुरातन मार्गाने जायचे?

"मोदी व त्यांचा पक्ष देव देव करीत निवडणुका लढवत आहे. देश पुरातन युगात नेण्याचा हा प्रकार. आधुनिकतेची कास धरायची, विज्ञानाचा मार्ग स्वीकारायचा, की मोदींच्या पुरातन मार्गाने जायचे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सध्या भाजपात असलेले वरुण गांधी यांनी नेमके वेगळे विचार मांडणारे भाषण केले. वरुण गांधी यांनी देशाचे खरे चित्रच त्यांच्या भाषणात मांडले. “मी भारतमातेला मानतो. मी हनुमानाचा भक्त आहे. प्रभू श्रीराम यांना मी देव मानतो, मात्र जय श्रीराम, भारतमाता की जय या केवळ घोषणा देऊन देशातील महागाई, बेरोजगारी अशा समस्या संपणार आहेत काय? देशातील प्रत्येक व्यक्ती महागाईने बेजार आहे. तरुणांना नोकरी नाही, रोजगार नाही. त्यामुळे उत्पन्न नाही. ज्या लोकांनी कर्ज काढले ते त्यांना परतफेड करता आले नाही तर मालमत्ता जप्त होईल. या सगळ्या समस्यांचा उपाय केवळ ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’ नाही.” वरुण गांधींचे हे म्हणणे बरोबर आहे," असंही राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.

मोदींचा देव त्यांचे रक्षण करू शकत नाही, कारण...

"मोदी हे युगपुरुष की विश्वपुरुष आहेत असे प्रमाणपत्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुंबईत येऊन दिले, पण या देशाला फक्त एका पुरुष नेतृत्वाची गरज आहे. जम्मू-कश्मीरात दिवसाआड जवानांचे बळी जात आहेत. मोदी देवळात जाऊन पूजेला बसले म्हणून जवानांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. हजारो कश्मिरी पंडित जे हिंदू आहेत ते आजही कश्मीरातील त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत. मोदींचा देव त्यांचे रक्षण करू शकत नाही. कारण धर्म आणि देवाचे अवडंबर माजवून फक्त मते मागितली जात आहेत. उत्तराखंडमधील एका बोगद्यात 41 मजूर 18 दिवसांपासून अडकून पडले होते. तेथे त्यांच्या सुटकेसाठी मनुष्यच प्रयत्न करीत होता. कोणताही महापुरुष देवाच्या दारात ध्यानमग्न बसला म्हणून 41 मजुरांचे प्राण वाचले नाहीत. यंत्र, विज्ञान आणि मनुष्याला शक्ती लावून बोगद्यातले दगड फोडून रस्ता करावा लागला. मोदी हे मंदिरात गेले व भस्म, चंदन लावून बसले ते तेलंगणातील हिंदूंची मते मिळावीत म्हणून. त्यांच्या ध्यानमुद्रेस घाबरून लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य माघार घेणार नाहीत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

महापुरुष, धर्मवीर, हिंदुहृदयसम्राट पदव्या स्वत:ला चिकटवून...

"उत्तर प्रदेशात राममंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याचे भव्य राजकारण केले जाईल. मोदी यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण होत आहे हे चांगले आहे, पण सध्या विविध सरकारी विभागांत सवा कोटी पदे रिक्त आहेत, ती कधी भरणार? या नोकऱ्या देण्याचे काम मंदिरातून होणार नाही. ते सरकारलाच करावे लागेल. 80 कोटी गरीब लोकांना सरकार मोफत रेशन देते. हे आत्मनिर्भर बनविण्याचे धोरण नाही. मोफत, फुकट देणे हे दुर्बळांना अधिक दुर्बळ व गरीब-गुलाम करणे. शेतकऱ्यांच्या मालास भाव नाही. हमीभाव तर नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, हे मोदी व त्यांच्या पक्षाचे वचन होते, ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी अयोध्येतील श्रीरामावर टाकता येणार नाही. गॅस सिलिंडर, केरोसिन, दूध, कांदा, कडधान्य महाग झाले. देवळात घंटा बडवून शेंड्यांना तूप लावून केदारनाथच्या गुहेत ध्यानस्थ बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करून या समस्या संपणार नाहीत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड ज्यांना युगपुरुष असे संबोधित आहेत त्यांनी आधी पुरुष व्हावे. पुरुषाने माणूस व्हावे व त्या माणसाने डोळे उघडून महान राष्ट्राच्या समस्यांकडे पाहावे. सध्या महापुरुष, धर्मवीर, हिंदुहृदयसम्राट पदव्या स्वत:ला चिकटवून घेण्याचे दुकान उघडले आहे. भाजपच्या राज्यात तेवढेच स्वस्त आहे," असं राऊत लेखाच्या शेवटी म्हणाले आहेत.