प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

मोदी सरकारचा मोठा निर्णय

Updated: Jan 25, 2019, 09:30 PM IST
प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर title=

नवी दिल्ली: ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानुसार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जनसंघाचे नेते नानाजी देशमुख (मरणोत्तर) आणि ज्येष्ठ संगीतकार भुपेन हजारिका (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कारांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नानाजी, हजारिका आणि प्रणवदांबद्दल गौरवोद्गार काढले. 'प्रणवदा आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजकीय नेते असल्याचे म्हटले. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. यासाठी खुद्द पंतप्रधानांकडून शिफारस केली जाते. मात्र, प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळात प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपद भुषविले होते. या काळात प्रणव मुखर्जींच्या सहकार्यामुळे मोदी सरकारला अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेणे शक्य झाले होते. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. प्रणव मुखर्जी यांचा संघाच्या व्यासपीठावरील हा वावर अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या ठरला होता. याशिवाय, प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय पश्चिम बंगालमध्ये सरकारसाठी फायदेशीर ठरू शकतो. या माध्यमातून केंद्र सरकारने बंगाली अस्मितेचे राजकारण साधल्याची चर्चा सुरु आहे.

याशिवाय, मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराचे मानकरी नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी आयुष्य वेचले. संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंघाची निर्मिती करण्यात नानाजी देशमुख यांचा मोठा वाटा होता. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी कार्य केले होते. त्यांच्या याच कार्याचा गौरव आता सरकारतर्फे करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ गायक भुपेन हजारीका यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. भुपेन हजारीका यांनी त्यांचे सगळे आयुष्य संगीत आणि गाण्यासाठी वेचले. एक पहाडी आवाजाचा गायक अशी त्यांची ख्याती होती. रुदाली या चित्रपटातील 'दिल हूम हूम करे' हे त्यांचे गाणे आजही लोकांच्या मनात रुंजी घालते आहे. हजारीका यांना याआधी पद्मविभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.