टोमॅटोमुळे मोडू लागले संसार! पतीने भाजीत टोमॅटो टाकल्याने पत्नी घर सोडून गेली निघून

Tomato Rates Hike: देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने 200 रुपयांचा टप्पा ओलांडल्याने अनेकांना या रोजच्या वापरतील फळभाजीला किचन बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र एका पतीला भाजीत टोमॅटो वापरणं चांगलच महागात पडलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 13, 2023, 08:16 AM IST
टोमॅटोमुळे मोडू लागले संसार! पतीने भाजीत टोमॅटो टाकल्याने पत्नी घर सोडून गेली निघून title=
या प्रकरणात आता पोलिस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Tomato Rates Hike: टोमॅटोच्या दराने (Tomato Price) 200 रुपयांचा टप्पाही ओलांडला आहे. देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने द्विशतकी मजल मारल्याचं पहायला मिळत असल्याने टोमॅटो स्वयंपाकात वापरावा की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मात्र याच कारणावरुन मध्य प्रदेशमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका दांपत्यामध्ये टोमॅटोच्या मुद्द्यावरुन वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की पत्नी घर सोडून निघून गेली. पीडित पतीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या दोघांचं समोपदेशन केलं असून दोघांचा संसार पुन्हा थाटण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.

नेमकं घडलं काय?

झालं असं की, जेवणाच्या डब्यांची सेवा पुरवणाऱ्या संजीव वर्मन यांनी स्वयंपाक करताना भाजीमध्ये टोमॅटो टाकलं. मात्र पतीच्या या कृतीचा पत्नीला एवढा राग आला की तिने यावरुन हुज्जत घातली. त्यानंतर ही महिला आपल्या मुलीला घेऊन थेट घर सोडून निघून गेली. संजीव यांनी पत्नीला समजवण्याचा फार प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. पत्नीने घर सोडून जाऊ नये म्हणून यापुढे आपण कधीच टोमॅटोही खाणार नाही अशी शपथही संजीव यांनी घेतली. त्यानंतरही पत्नीने आपला घर सोडण्याचा निर्णय बदलला नाही.

पोलिसांनी अनेकदा फोन केला पण...

घर सोडून निघून गेलेली पत्नी नेमकी कुठे गेली आहे याचा शोध घेण्यासाठी संजीव यांनी स्थानिक पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली. पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी संजीवकडे पत्नीचा मोबाईल नंबर मागितला. मात्र तिचा फोन स्वीच ऑफ असल्याचं सांगितलं जात होतं. वारंवार प्रयत्न करुन पोलिसांना अखेर संजीव यांची पत्नी आरतीशी संपर्क साधण्यात यश आलं. त्यावेळी आरती ही उमरिया येथे तिच्या बहिणीच्या घरी गेल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी संजीव आणि आरती यांच्यात बोलणं करुन दिली. दोघांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत. संजीव वर्मा हे डब्याची सेवा पुरवण्याबरोबरच एक छोटं हॉटेलही चालवतात. 

नक्की वाचा >> टोमॅटोमुळे पुणेकर शेतकरी झाला कोट्यधीश! दिवसाला तब्बल 18 लाखांची कमाई

खरं कारण टोमॅटो की...

धनपुरी पोलीस स्टेशनचे प्रमुख संजय जयसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरती वर्मन यांच्याशी संपर्क साधला असता तिने पती संजीव हा तिला दारुच्या नशेत मारहाण करत असल्याचं सांगितलं. यामुळेच आरती नाराज झाली असून ती 4 वर्षांच्या मुलीसहीत बहिणीच्या घरी निघून गेल्याचं सांगितलं जात आहे. तर संजीवने मात्र टोमॅटोच्या मुद्द्यावरुन आमच्यात वाद झाल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. या दोघाचंही लग्न 8 वर्षांपूर्वी झालं असून आता टोमॅटोच्या मुद्यावरुन त्यांच्यात अगदी घर सोडण्यापर्यंतचा वाद झाला आहे.