ऑनलाईन रमी म्हणजे जुगार आहे का? कर्नाटक उच्च न्यायालय म्हणतं...

Karnataka High Court: प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले, तशी अनेक कामं शक्य झाली. पण त्याचबरोबर ऑनलाईन गेम्सचा नादही लागला. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेत.

राजीव कासले | Updated: May 16, 2023, 07:15 PM IST
ऑनलाईन रमी म्हणजे जुगार आहे का? कर्नाटक उच्च न्यायालय म्हणतं... title=

Karnataka High Court: इंटरनेटच्या युगात स्मार्टफोनचा (Smart Phone) वापर वाढत गेला तशी अनेक कामं घरबसल्या होऊ लागली. ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) असो की ऑनलाई खाद्यपदार्थ मागवणं असो, एका बटणावर सर्व शक्य झालं आहे. आपला जास्तीत जास्त वेळ हा मोबाईलवर (Mobile) जाऊ लागला आहे. त्यातच मोबाईलवर सहज उपलब्ध असणाऱ्या मोबाईल गेम्सचं लहान मुलांसह मोठ्यांनाही व्यसन लागलं आहे. असं असतानाही कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

एका प्रकरणात निकाल देताना कर्नाटक उच्च न्यायालयाने पत्नाने खेळला जाणारा रमी (Rummy) हा खेळ जुगार नसल्याचं म्हटलं आहे. या खेळात पैसे लावले जात असतानाही रमी हा बुद्धीमतेचा खेळ असल्याचं न्यायमूर्ती एसआर कृष्णा कुमार यांनी म्हटलं आहे. रमी या खेळात पैशाचा वापर होत असो कि नाही पण तो जुगार नाही. ऑफलाईन किंवा ऑनलाईन रमीमध्ये (Online Rummy) काही अंतर नाहीए, दोन्ही खेळात कौशल्याचा वापर होतो असा तर्क कोर्टाने मांडलाय.

21 हजार कोटीची नोटीस
ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म ग्रेम्सक्राफ्टला (Game Craft)  वस्तू आणि सेवा कर महासंचालनालयाने 21 हजार कोटींची नोटीस पाठवली होती. याप्रकरणात कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर हायकोर्टाने नोटीशीली स्थगिती दिली. तसंच निर्णय देताना रमी हा बुद्धीमतेचा खेळ असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला.

काय आहे प्रकरण?
8 सप्टेंबर 2022 रोजी गेम्सक्राफ्ट कंपनीच्या नावाने जीएसटी अधिकाऱ्यांनी एक सूचना नोटीस जारी केली. यात 21 हजार कोटी रुपये कर म्हणून मागणी करण्यात आली. या नोटीशीला गेम्सक्राफ्ट कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं. रमी खेळात पैसे लावले जात असले तरी त्यात बुद्धीमत्ता वापरावी लागते, त्यामुळे तो सट्टेबाजीचा खेळ होऊ शकत नाही असा दावा कंपनीने याचिकेत केला होता. 

ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर खेळल्या जाणाऱ्या खेळांवर सट्टेबाजी आणि जुगारांअंतर्गत कर लावणं योग्य नाही असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. GST कायद्यातील सट्टेबाजी आणि जुगार या अटींमध्ये कौशल्याच्या खेळांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश होत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. 

भारतात ऑनलाईन गेम तेजीत
भारतात ऑनलाईन गेमिंग हा प्रकार चांगलाच बोकाळला आहे. पत्त्यांमधला रमी असो किंवा फॅंटसी क्रिकेट गेम असो, अनेकजणं यात गुंतलेली असतात.  मध्यंतरी आलेल्या 'पब-जी'  या खेळाने तर पालकांची झोप उडवली होती, शाळकरी मुलांना तर या गेमचं जणू व्यसनच लागलं होतं. 2022 च्या अखेरपर्यंत भारतीय मोबाईल गेमिंगमधून मिळणारे उत्पन्न हे 1.5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2025  पर्यंत हा आकडा 5 अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे.