मृतदेह मध्यभागी ठेवून कुटुंबीयांनी काढला हसतमुख फोटो, सोशल मीडियावर रंगला वाद

अंतिम संस्कारावेळी काढलेल्या एका फोटोवरुन सोशल मीडियावर वाद

Updated: Aug 25, 2022, 10:44 PM IST
मृतदेह मध्यभागी ठेवून कुटुंबीयांनी काढला हसतमुख फोटो, सोशल मीडियावर रंगला वाद title=

Trending News : अंतिम संस्कारावेळी काढलेल्या एका फोटोवरुन सध्या सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगलाय. मृतदेह मध्यभागी ठेऊन कुटुंबातील सदस्यांनी फोटो काढला आहे, फोटो काढताना सर्वांचे चेहरे हसरे आहेत. या फोटोवरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. कुटुंबातील एका व्यक्तीचं निधन झालं असताना कुटुंबातील व्यक्तींकडून आनंद का साजरा केला जात आहे असा प्रश्न विचारला जात आहे. 

केरळमधल्या पटानथिट्टा जिल्ह्यातील मालापल्ली गावातील ही घटना आहे. मरियम्मा या 95 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मरियम्मा या गेल्या एक वर्षांपासून आजारी होत्या. मरियम्मा यांना 9 मुलं आणि 19 नातवंडं आहेत. मरियम्मा यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व कुटुंब एकत्र आलं होतं. यावेळी मरियम्मा यांचा मृतदेह मध्यभागी ठेऊन सर्व कुटुंबियांनी हसऱ्या चेहऱ्यांने एक फोटो काढला.

या फोटोवर मोठ्याप्रमाणावर टीका झाल्यानंतर मरियम्मा यांचा मुलगा डॉ. जॉर्ज ओमेन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मरियम्मा शेवटच्या श्वासापर्यंत आनंदाने जगल्या. तिचं तिच्या सर्व मुलांवर आणि नातवंडांवर खूप प्रेम होतं. ते क्षण जपण्यासाठी कुटुंबीयांनी हा फोटो काढला. शोक करण्याऐवजी आम्ही मरियम्माला आनंदाने निरोप देण्याचा निर्णय घेतल्याचं डॉ. जॉर्ज ओमेन यांनी सांगितलं.

केरळच्या शिक्षण मंत्र्यांचा पाठिंबा
केरळचे शिक्षणमंत्री वी शिवनकुट्टी यांनीही मरियम्मा यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबूकवर एक पोस्टही शेअर केली आहे. मरियम्माचा मृत्यू ही कुटुंबियांसाठी वेदनादायी बाब आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने जगणाऱ्या मरियम्माला हसतमुखाने निरोप देणं, यापेक्षा आनंदाची कोणती गोष्ट असू शकते असं शिवनकुट्टी यांनी म्हटलंय. तसंच या फोटोवर नकारात्मक प्रतिक्रिया देणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

सोशल मीडियावर या फोटोवरुन वाद उभा निर्माण झाला आहे, काही जणांनी यावर टीका केली आहे तर काही जणांनी कुटुंबियांच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.