आदिवासींनी बनवले झाडांच्या पानांपासून मास्क

 स्वतःच नैसर्गिक स्रोतांचा वापर करुन मास्क तयार केले

Updated: Mar 26, 2020, 11:39 AM IST
आदिवासींनी बनवले झाडांच्या पानांपासून मास्क  title=

गडचिरोली : कोरोना वायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून शहरी भागात मास्कचा वापर केला जातो. वनव्याप्त आदीवासी समाजात मात्र लोकांनी यासाठी अनोखा उपाय शोधला आहे. गडचिरोली जिल्हयासह लगतच्या बस्तरमध्ये  आदीवासी अतिदुर्गम भागात झाडांच्या पानापासुन मास्क तयार करुन वापर करीत असल्याचे दिसून आले आहे.  आदिवासी भागात  नागरिकांकडे आरोग्याच्या सुविधा नाहीत या सुविधा नसल्या तरी कोरोनापासुन बचावासाठी आदीवासीनी जनजागृती सुरु करत स्वतःच नैसर्गिक स्रोतांचा वापर करुन मास्क तयार केले आहेत. 

इथल्या नागरिकांनी  नाका-तोंडाला झाडांची पाने बांधून, हे नागरिक संसर्गापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अबुझमाड हा घनदाट जंगल परिसर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर आहे. या जंगलाला नक्षली किल्ला म्हटले जाते. या भागात आदिवासींची संख्या अधिक आहे. मात्र या आदिवासी नागरिकांपर्यत आरोग्य सुविधा पोहोचत नाहीत.या नागरिकांपर्यंत कोरोना आजाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:हून काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. 

हा अतिसंवेदलशील आणि नक्षलग्रस्त भाग असल्याने, इथे कुणी मास्क वाटप करणे शक्य नाही. त्यामुळे छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील आमाबेडा परिसरातील भर्रीटोला गावात, लोकांनी झाडांच्या पानांपासून मास्क बनवून ते वापरण्यास सुरुवात केली. आदीवासी नागरीक गावात सभा आयोजित करुन नागरीकाना  कोरोनाविषयी माहिती देऊन जनजागृती  आहेत. 

कोरोनामुळे मास्कचा तुटवडा असला तरी आदिवासीनी  पानांपासून तयार केलेल्या मास्क स्वीकारला आहे. दिवसभर वापरल्यानंतर आदिवासी  हे मास्क जाळुन टाकत नष्ट करतात.