आगरतळा : सलग पाचव्यांदा सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेणाऱ्या त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांची संपत्ती केवळ ३९३० रुपये आहेत. उल्लेखनीय म्हणजे, त्यांन आजवर कधीही इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर परतावा) दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही.
मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीआधी दाखल केलेल्या नामांकन पत्रात जाहीर केलल्या उत्पन्नाच्या माहितीतून ही माहिती प्राप्त झालीय. धानपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढणाऱ्या सरकार यांनी सोमवारी (२९ जानेवारी) रोजी नामांकन पत्र दाखल केलं.
माणिक सरकार आपलं संपूर्ण वेतन 'माकपा'ला दान देतात... आणि त्यांना पक्षाकडून उपजीविका भत्ता म्हणून महिन्याला पाच हजार रुपये मिळतात. घोषणापत्रानुसार, ६९ वर्षीय माणिक सरकार यांच्याकडे केवळ १५२० रुपये रोख रक्कम आहेत तर २४१० रुपये त्यांच्या खात्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे आणखी कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही.
इतकंच नाही तर त्यांच्या नावावर कृषीयोग्य किंवा घर बनवण्यासाठी कोणतीही जमीन नाही... ते मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवस्थानी राहतात.
मुख्यमंत्र्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य सेवानिवृत्त केंद्र सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे २०,१४० रुपये रोख रक्कम तर दोन बँक खात्यांत १,२४,१०१ आणि ८६,४७३ रुपये जमा आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे दोन लाख, पाच लाख आणि २.२५ लाख रुपयांच्या मुदत ठेवीशिवाय २० ग्रॅमचे दागिने आहेत. पांचाली यांना ८८८.३५ स्क्वेअर फूट क्षेत्राची जमीन वारसा हक्कानं मिळालीय... आणि या क्षेत्रावर निर्माणसाठी त्यांनी आत्तापर्यंत १५ लाख रुपयांची गुंतवणूक केलीय. जमिनीची सद्य किंमत २१ लाख रुपये आहे. पांचाली यांनीही याअगोदर २०११-१२ मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलं होतं त्यावेळी त्यांनी आपलं उत्पन्न ४,४९,७७० रुपये असल्याचं जाहीर केलं होतं.