गाडी थांबवली म्हणून भाजपचे मंत्रीमहोदय सरकारी अधिकाऱ्यावर भडकले

तुम्ही माझी गाडी जप्त करू शकत नाही.

Updated: Mar 31, 2019, 08:48 AM IST
गाडी थांबवली म्हणून भाजपचे मंत्रीमहोदय सरकारी अधिकाऱ्यावर भडकले title=

पाटणा: केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्याविरोधात आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपकडून बक्सर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभेच्या ठिकाणी येताना चौबे यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. या गोष्टीला बक्सर परिमंडळाचे अधिकारी कृष्ण कुमार यांनी आक्षेप घेतला. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे कृष्ण कुमार यांनी अश्विनी कुमार चौबे यांना सांगितले. तेव्हा अश्विनी कुमार चौबे चांगलेच भडकले. तुम्ही माझी गाडी जप्त करू शकत नाही, असे बोलत चौबे यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. 

यानंतर चौबे यांनी हा कोणाचा आदेश आहे, असा प्रतिप्रश्नही कृष्ण कुमार यांना विचारला. त्यावर कृष्ण कुमार यांनी हा निवडणूक आयोगाचा आदेश असल्याचे म्हटले. यामुळे चौबे आणखीनच संतापले आणि म्हणाले, तुम्ही मला तुरुंगात टाकणार, चला मला नेऊन दाखवा. तेव्हा अश्विनी कुमार चौबे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. यानंतर अश्विनी कुमार चौबे तेथून निघून गेले. मात्र, कृष्ण कुमारही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अश्विनी कुमार यांच्या गाड्यात ३० ते ४० गाड्या होत्या. त्यामुळे तक्रार दाखल होणार, असे कृष्ण कुमार यांनी सांगितले.