पतीचा मृतदेह घरी नेताना अ‍ॅम्ब्युलन्सला जोरदार धडक; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

Ambulance Accident : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ते अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त करत जखमींना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

आकाश नेटके | Updated: Jul 29, 2023, 10:21 AM IST
पतीचा मृतदेह घरी नेताना अ‍ॅम्ब्युलन्सला जोरदार धडक; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू title=

UP Accident : उत्तर प्रदेशच्या (UP News) उन्नावमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उन्नावमध्ये एका रस्ते अपघातात अख्खं कुटुंबच संपलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरपासून (Kanpur) 35 किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा समावेश आहे. वडिलांचा मृत्यू झाल्याने मुली आईसह रुग्णालयातून त्यांचा मृतदेह घरी आणत होते. मात्र वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी या रुग्णवाहिकेत चार मुलीही उपस्थित होत्या. तर इतर सदस्य घरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते. मात्र, वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघाताची झाला. हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचे तुकडे झाले आणि महिलेसह तिच्या तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

तुरसौर गावाच्या जवळ हा भीषण अपघात झालाय. प्रदीर्घ आजारामुळे धनीराम सविता यांचा कानपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. धनीराम यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक गावी परतत होते. मात्र रुग्णवाहिकेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती होती की रुग्णवाहिकेचे तुकडे झाले आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पूर्वा आणि मौरवान पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात चौथी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये प्रेमा सविता, मंजुला, अंजली, रुबी यांचा मृत्यू झाला आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

या अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव आणि बस्ती जिल्ह्यांतील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करताना त्यांनी शोकसंतप्त कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.