13 वर्षीय मुलीने 2 धाकट्या बहिणींना संपवलं! पोलिसांना म्हणाली, 'आमचं कुटुंब मोठं आहे, सगळी कामं..'

Uttar Pradesh Crime News: पोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटास्थळी धाव घेतली. त्यावेळेस दोन्ही मुलांचे मृतदेह घरातील बेडवर आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली

स्वप्निल घंगाळे | Updated: May 21, 2024, 02:05 PM IST
13 वर्षीय मुलीने 2 धाकट्या बहिणींना संपवलं! पोलिसांना म्हणाली, 'आमचं कुटुंब मोठं आहे, सगळी कामं..' title=
हा सारा प्रकार समजल्यावर गावकऱ्यांना बसला धक्का

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये एका दुहेरी हत्याकांडासंदर्भात धक्कादायक खुलासा झाला आहे. गुरुवारी रात्री येथील 5 आणि 7 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींची हत्या करण्यात आली. रात्रीच्या अंधारामध्ये हे हत्याकांड घडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून मृत मुलींची थोरल्या बहिणीला ताब्यात घेण्यात आलं तेव्हा सर्वांच्या पायाखालील जमीनच सरकली. आपल्या बाजूला झोपलेल्या दोन्ही बहिणींचा या मुलीने ओढणीने गळा आवळून प्राण घेतल्याचं तपासात स्पष्ट झालं. पोलिसांनी या मुलीची चौकशी केली असताना तिने आपली गुन्हा कबूल केला आहे. हा सारा प्रकार बिजनौरमधील नूरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोहावर गावात घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे काही वेळातच खऱ्या गुन्हेगाराची ओळख पटवली.

...म्हणून बहिणींना संपवलं

सुरुवातीला या 13 वर्षीय मुलीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असता ती वारंवार आपलं म्हणणं बदलत होती. मात्र पोलिसांनी वारंवार आणि वेगवेगळे प्रश्न विचारत काही काळ सतत तिची चौकशी सुरु ठेवल्याने या मुलीने तिच्या गुन्ह्याची कबुली दिली. आमचं कुटुंब फार मोठं आहे. माझे बाबा कायम चिंतेत असायचे. घरातील सगळी कामं मलाच करावी लागायची, म्हणून मी दोन्ही बहिणींना संपवलं, असं या मुलीने पोलिसांना सांगितलं. या मुलीच्या आईचं हे दुसरं लग्न आहे. ही मुलगी महिलेला पहिल्या पतीपासून झालेली असून सध्या राहत असलेल्या पतीपासून महिलेला 2 मुली होत्या. म्हणजेच या मुलीने वडील चिंतेत असल्याने तिच्या सावत्र बहिणींना संपवलं.

महिलेची दोन लग्नं

गुरुवारी मध्यरात्रीच्या आसपास सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक नीरज कुमार जदौन अन्य पोलीस अधिकाऱ्यांबरोबर घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळेस दोन्ही लहान मुलींचे मृतदेह खाटेवर पडलेले आढळून आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. पोलिसांनी घरातील लोकांची चौकशी केली. त्यांना या मुलींच्या बाजूलाच झोपलेल्या थोरल्या बहिणीनेच हे केलं असावं अशी शंका आली. या मुलीने सुरुवातीला पोलिसांना उलट-सुलट उत्तरं दिली. मात्र नंतर तिने गुन्हा कबुल केला. आरोपी मुलीच्या आईचं हे दुसरं लग्न आहे. तिने 12 वर्षांपूर्वी तिचा पहिला पती पुखराजला सोडून दिलं. या दोघांना दोन मुली होत्या. तर दुसरा पती म्हणजेच सहदेवकडून या महिलेला दीड वर्षांचा एख मुलगा आणि 3 मुली आहेत. 

नक्की वाचा >> अनैसर्गिक संबंध ठेवताना पत्नीला मूळव्याध असल्याचं समजलं अन्..; थेट कोर्टात पोहोचलं प्रकरण

पती-पत्नी आणि सहा मुलं असा परिवार

मात्र या आरोपी मुलीच्या आईने तिच्या पहिल्या पतीला का सोडलं याची माहिती समोर आलेली नाही. ही महिला सहा मुलं आणि दुसऱ्या पतीबरोबर राहत होती. तिचा पती वीट भट्टीवर मजूर म्हणून काम करतो. ज्या दिवशी हे हत्याकांड घडलं तेव्हा सर्वजण एकाच खोलीत झोपले होते. सर्वजण झोपल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपी मुलीने आपल्या दोन्ही लहान बहिणींची गळा आवळून हत्या केली.