मुंबई - बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज न फेडता परदेशात पळून गेलेला मद्यव्यापारी विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. मल्ल्याला मायदेशी आणल्यास त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय तपास अधिकाऱ्यांनी दिली. यासाठी कारागृहात विशेष सुरक्षा असलेली बराक राखून ठेवण्यात आली आहे.
कर्जबुडवेगिरी आणि पैशांची अफरातफर या प्रकरणात मल्ल्या सोमवारी ब्रिटनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयात उपस्थित राहणार आहे. गेल्यावर्षी एप्रिलपासून मल्ल्या प्रत्यार्पण खटल्यात जामीनावर आहे. जर कोर्टाने सोमवारी त्याचा जामीन रद्द करून त्याला भारतीय तपास पथकाच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला तातडीने मुंबईत आणले जाईल. मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील दुमजली बिल्डिंगमध्ये विशेष सुरक्षित बराकीमध्ये त्याला ठेवण्यात येईल. याच बराकीमध्ये दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब यालाही ठेवण्यात आले होते. जर मल्ल्याला भारतात आणण्यात आले, तर त्याच्या सुरक्षेची आम्ही सर्वोतोपरी काळजी घेऊ, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आर्थर रोड कारागृहातील विशेष सुरक्षा असलेल्या बराकीजवळच डॉक्टरांचे एक पथकही सज्ज असते. जर मल्ल्याला कोणताही त्रास होऊ लागला, तर त्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथकही तिथेच तैनात असेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आर्थर रोड कारागृहातील विशेष सुरक्षित बराकींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील कैद्यांवर सुरक्षारक्षकांचे कायम लक्ष असते. इतर कैद्यांपासूनही या बराकीतील कैद्यांना दूर ठेवण्यात येते. त्यासाठी शस्त्रसज्ज सुरक्षारक्षकही बराकीबाहेर सज्ज असतात.
मल्ल्याला भारतीय तपास पथकांच्या ताब्यात दिल्यावर त्याला कुठे ठेवण्यात येईल, असा प्रश्न ब्रिटनमधील न्यायालयाने विचारला होता. त्यासाठी आर्थर रोड जेलचा व्हिडिओही न्यायालयाने मागविला होता. आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा केंद्र सरकारने घेतला असून, त्याचा एक अहवालही ब्रिटनमधील न्यायालयाला सुपूर्द करण्यात आला आहे.