नवऱ्याच्या मित्राला बनवलं आपला नवरा... सिनेमा स्टाईलने महिलेकडून खूनाचा कट

ही महिला तीन वर्षापासून ज्या क्षणाची वाट पाहात होती तो क्षण अखेर आला 

Updated: Jul 24, 2021, 06:48 PM IST
नवऱ्याच्या मित्राला बनवलं आपला नवरा... सिनेमा स्टाईलने महिलेकडून खूनाचा कट title=

इस्लामाबाद : सिनेमा पाहायला आपल्यापैकी कोणाला आवडत नाही, त्यात ससपेन्स आणि थ्रिलर सिनेमे तर लोकं आवर्जून पाहातात. आपल्याला कितीही असे सिनेमे आवडले तरी, आपल्याला माहित असते की, सिनेमातल्या गोष्टी सिनेमापर्यंतच सिमीत असतात. त्याचा खऱ्या आयुष्याशी काही एक संबंध नसतो, तसेच हे सगळं काल्पनीक असल्यामुळे हे खऱ्या आयुष्यात घडणे शक्य नाही. परंतु तुम्हाला आज आम्ही अशी एक घटना सांगणार आहोत जी तुम्हाला सिनेमातील वाटेल, परंतु ही खऱ्या आयुष्यातील घटना आहे.

आपल्या पतीच्या मारेकऱ्याचा सूड घेण्यासाठी महिला अशी योजना बनवते, जी सर्वांनाच आश्चर्यचकित करते. त्या महिलेने सूड घेण्यासाठी समोरील व्यक्तीसाठी मृत्यूचं जे जाळ विणलं होतं, त्याची कोणीही कल्पना देखील करु शकणार नाही.

ही घटना पाकिस्तानच्या आदिवासी भागातील बाजौर जिल्ह्यातील आहे. जिथे एक महिला गेल्या तीन वर्षांपासून आपल्या पतीच्या मारेकऱ्याचा सूड घेण्याच्या प्रयत्नात होती. यासाठी तिने सिनेमातील मार्ग अवलंबला आणि फिल्मी स्टाईलमध्ये, तिने तिच्या पतीच्या मारेकऱ्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्याशी लग्न देखील केले.

ही महिला तीन वर्षापासून ज्या क्षणाची वाट पाहात होती तो क्षण अखेर आला आणि त्या महिलेनं त्याला ठार केलं. हत्येनंतर या महिलेला पोलिसांनी अटक केली आणि तुरूंगात पाठविले आहे.

एका मीडिया वृत्तानुसार, तीन वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. तिच्या नवऱ्याचे नैसर्गिक मृत्यू झाला होता की, खून झाला हे काही समजू शकले नाही. परंतु या महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या पतीची हत्या त्याचा मित्र गुलिस्तानने विषाचे इंजेक्शन देऊन केली होती. पोलिसांनी याबद्दल हत्येचा किंवा मृत्यूचा कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.

गुन्हा का नोंदविला गेला नाही?

पोलिसांनी सांगितले की, ही हत्या तीन वर्षांपूर्वी घडली आहे आणि महिलेच्या पतीच्या खून झाल्याचा कोणाताही पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गुलिस्तान नावाच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, तेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांना गुलिस्तानचा मृतदेह पलंगावर रक्ताने भरलेला दिसला. गुलिस्तानच्या डोक्यात गोळी घातली होती. त्यानंतर त्या महिलेने पोलिसांना जे सांगितले ते ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले आहे.

ती महिला काय म्हणाली?

या महिलेने सांगितले की, तिचा नवरा पेशावरमध्ये काम करायचा आणि त्याचा सुखाचा संसार सुरु होता. मुलगी झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अधिक आनंद आला. ही महिला म्हणाली, 'माझ्या पतीची गुलिस्तान नावाच्या माणसाशी खास मैत्री होती. त्यांनी पेशावरमध्ये जे काही पैसे कमवले
ते तो गुलिस्तानला देत असत. त्याने सांगितले की, गुलिस्तान पैशांची गरज आहे आणि तो लवकरच ते पैसे परत देईल. परंतु काही काळानंतर जेव्हा माझ्या पतीने तो आजारी असल्याचे सांगून गुलिस्तानकडे पैशाची मागणी केली, तेव्हा त्याने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगून ते परत करण्यास नकार दिला."

महिलेच्या म्हणण्यानुसार, गुलिस्तानने महिलेच्या पतीला त्याच्याकडे पैसे नाही असे तर सांगितले परंतु तो त्याला औषधे आणून देऊ शकतो असे सांगितले. गुलिस्तानने या महिलेच्या नवऱ्याला एक इंजेक्शन दिले आणि बाकीचे औषधे घरी जाऊन खायला सांगितले. इंजेक्शन घेतल्यानंतर महिलेच्या पतीची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. महिलेले कळाले की, गुलिस्तानने आपल्या नवऱ्याला इंजेक्शन दिले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्या इंजेक्शनमध्ये विष असल्याचे तिला समजले. त्यावेळीच तिच्या मनात सुडाची भावना तयार झाली.

याचा सुड घेतला

सूड उगवण्यासाठी ही महिला योजना तयार करु लागली आणि तिने गुलिस्तानला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. गुलिस्तान आधीपासूनच विवाहित होता, परंतु त्या महिलेनं त्याला तिच्या सौंदर्यात जाळ्यात अडकवले आणि अखेर तो लग्न करण्यास तयार झाला.

यानंतर, गुलिस्तान आणि ती महिला भाड्याने एका ठिकाणी राहू लागली. तेव्हा गुलिस्तानने भाड्याच्या घरात एकटे राहत असल्यामुळे संरक्षणासाठी एक पिस्तूल विकत घेतले, तेव्हा त्या महिलेला हातात आयतं कोलीतच मिळालं. त्यानंतर एका रात्री झोपेत असताना या महिलेने गुलिस्तानच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. सध्या ही महिला तुरूंगात आहे आणि पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.