बंदूक घेऊन घरात घुसलेल्या चोरांशी मायलेकी वाघिणीसारख्या लढल्या, VIDEO तुफान व्हायरल

हैदराबादमध्ये घरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोराशी महिला आणि तिच्या मुलीने शूरपणे लढा दिल्याचं सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. व्हिडीओत दोघीजणी एका चोराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Mar 22, 2024, 06:26 PM IST
बंदूक घेऊन घरात घुसलेल्या चोरांशी मायलेकी वाघिणीसारख्या लढल्या, VIDEO तुफान व्हायरल title=

घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या दोन चोरांशी आई आणि मुलीने शौर्याने लढा देत पळवून लावलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या हातात बंदुका होत्या. लुटण्याच्या उद्देशाने दोघे त्यांच्या घऱात घुसले होते. पण आई आणि मुलीने धाडस दाखवत त्यांच्याशी दोन हात केले. गुरुवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. हैदराबादमध्ये झालेली ही घटना घराच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मायलेकीचं कौतुक केलं जात आहे. पोलिसांनीही त्यांचा सत्कार करत शौर्य दाखवल्याबद्दल सन्मान केलं आहे. 

42 वर्षीय अमिता मेहोत आणि त्यांची मुलगी गुरुवारी दुपारी घऱी होत्या. 2 वाजता घऱाची बेल वाजल्यानंतर मोलकरणीने दरवाजा उघडला. यावेळी दोन तरुण दरवाजात उभे होते. आपण पार्सल देण्यासाठी आलो आहोत असा दावा त्यांनी केला. यानंतर मोलकरणीने त्यांना दरवाजातच थांबण्यास सांगितलं. याचवेळी सुशील नावाच्या आरोपीने बंदूक काढली. यादरम्यान त्याचा सहकारी प्रेमचंद याने चाकू मोलकरणीच्या गळ्यावर ठेवला.

यानंतर दोघे जबरदस्ती घऱात घुसले आणि सर्व मौल्यवान वस्तू आपल्याकडे सोपवण्याची मागणी केली. पण त्यांना आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना नव्हती. कारण धाडसी माय-लेकीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी सुशीलला लाथ घातली आणि मदतीसाठी आरडाओरड सुरु केली. 

सीसीटीव्हीत दोघीही एका आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आरोपी त्यांना मारहाण करत असतानाही दोघी मात्र त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यादेखील त्याला जोरदार प्रतिकार करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यानंतर मात्र अखेर आरोपी गेटमधून पळ काढतो. दरम्यान शेजारी प्रेमचंदला पकडतात पण सुशील पळून जाण्यात यशस्वी होतो. पण काही वेळाने त्यालाही पकडण्यात यश मिळतं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे आरोपी एका वर्षापूर्वी या घऱात कामाला होते. अमित यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अनोखं धाडस दाखवल्याबद्दल पोलिसांनी मायलेकीचा सत्कार केला आहे. यावेळी पती आणि वडील उपस्थित राहून हा क्षण डोळे भरुन पाहत होते.