'त्या' काश्मिरी मुलीचं बर्फवृष्टीविषयीचं वार्तांकन जिंकतंय नेटकऱ्यांची मनं

काश्मीर शोपियां भागातून आपण पाहात आहात... 

Updated: Feb 10, 2019, 04:02 PM IST
'त्या' काश्मिरी मुलीचं बर्फवृष्टीविषयीचं वार्तांकन जिंकतंय नेटकऱ्यांची मनं  title=

श्रीनगर : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आलेली थंडीची लाट सध्या सर्वांनाच चिंतातूर करत आहे. उत्तरेकडे तापमानात होणारी घट आणि त्यामुळे होणार बर्फवृष्टी या साऱ्याचे थेट परिणाम देशाच्या इतर भागांवरही पाहायला मिळत आहेत. अशा या संपूर्ण परिस्थितीची माहिती विविध वृत्तवाहिन्यांकडून देण्यात येत आहे. पण, त्यातही एका चिमुरडीने केलेल्या वार्तांकनाचा व्हिडिओच सध्या अनेकांचं लक्ष वेधत असून, चर्चेचा विषय ठरत आहे. 

जम्मू- काश्मीर परिसरात होणारी बर्फवृष्टी पाहता तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळेला सुट्टी असल्यामुळे बच्चेकंपनी या बर्फात धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. अशाच खेळाखेळामध्ये शोपियां या भागातील एक लहान मुलगी चक्क एका बातमीचं सराईतापर्माणे वार्तांकन करत आहे. विविध ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन देणारं तिचं हे वार्तांकन पाहता या वयात तिची भाषेवरील पकड, आत्मविश्वास आणि आजूबाजूच्या परिस्थितीविषयी पूर्ण आढाव घेत ती मांडण्याची समज या गोष्टी अधोरेखित होत आहे. 

शोपियांमधील बच्चेकंपनीने त्यांच्या घराबाहेर साठलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्यातच खेळण्यासाठी म्हणून चक्क एक गुफा साकारली आहे. दोन लहान मुलं मावतील अशी ही गुफा दाखवत असताना कशा प्रकारे सुट्टीचा आनंद ही मुलं घेत आहेत याचंच वर्णन ती या वार्तांकनात करत आहे. सोशल मीडियावर या चिमुरडीची अनेकांनीच वाहवा केली असून, मोठ्या प्रमाणावर तो शेअरही करण्यात येत आहे. त्यामुळे अडचणीच्या प्रसंगातही विरंगुळा शोधत एका सुरेख पर्यायाची निवड करणाऱ्या या मुलीचा अंदाज म्हणजे, 'क्या बात' असंच म्हणावं लागेल.