गुजरातला पुराचा वेढा, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

गुजरातला महापुराचा वेढा, महाराष्ट्रात हवामान विभागाकडून अलर्ट

Updated: Jul 11, 2022, 04:48 PM IST
गुजरातला पुराचा वेढा, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू title=

मुंबई : महाराष्ट्राशेजारील राज्यात मुसळधार पावसामुळे कहर पाहायला मिळाला आहे. ओरसंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महापूर आला.  गुजरातच्या वलसाडमध्ये पुरानं हाहाकार उडवून दिलाय. ओरसंगा नदीला पूर आल्यानं त्याचा फटका मुक्या जनावरांनाही बसत आहे. 

पुराच्या पाण्यात गायींचा कळप वाहून जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला. वलसाडमध्ये अनेक घरं, तसंच मंदिरंही पाण्याखाली जाऊ लागलीयत. तर आपत्ती व्यवस्थापनाची पथंक रेस्क्यू बोटीतून सतत फिरत असून बचावकार्य राबवत आहेत. 

गुजरातमधील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. वलसाड जिल्ह्यात ओरसांग नदीची पाणीपातळीत वाढ झाल्याने सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नवसारी जिल्ह्यात कावेरी आणि अंबिका नद्याही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे, नवसारी जिल्ह्यातून 300 तर वलसाड जिल्ह्यातून 400 जणांचे स्थलांतर करण्यात आले.

NDRFच्या पथकानं बचाव कार्य राबवत हेलिकॉप्टरच्या मदतीन अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं आहे. तर महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. 

पुढील दोन तासांत मुंबई-ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. मुंबई-ठाण्यासह पालघरमध्येही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 14 जुलैला कोकण आणि उ. महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. सध्या अनेक ठिकाणी अधून मधून पावसाच्या सरी सुरू आहेत. आता पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.