पायलट अभिनंदन यांचे ११ व्हिडिओ यूट्यूबवरून हटवले

  मिग-२१ पायलट अभिनंदन यांच्यासंबंधी जाहीर करण्यात आलेल्या व्हिडिओ माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानंतर यूट्यूबवरून हटविण्यात आल्या आहेत

Updated: Mar 1, 2019, 10:32 AM IST
पायलट अभिनंदन यांचे ११ व्हिडिओ यूट्यूबवरून हटवले title=

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेतील मिग-२१ पायलट अभिनंदन यांच्यासंबंधी जाहीर करण्यात आलेल्या अनेक व्हिडिओ माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने यूट्यूबवरून हटविल्या आहेत. विंग कमांडर अभिनंदन यांचा अपमानास्पद व्हिडिओ पाकिस्तानकडून यूट्यूबवर अपलोड करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. त्यानंतर यूट्यूबला याबाबत नोटीस पाठवण्यात आली. त्याचे पालन करत यूट्यूबने अभिनंदन यांच्याशी निगडीत असलेल्या ११ व्हिडिओ काढून टाकल्या आहेत. 

पाकिस्तान आर्मीकडून एक व्हिडिओ जाहीर करण्यात आला होता. या व्हिडिओत पाकिस्तानी आर्मीकडून अभिनंदन यांना त्यांच्याविषयी प्रश्न विचारले जात होते आणि त्या प्रश्नांची अभिनंदन चोख उत्तरे देत होते. हा व्हिडिओ जाहीर करण्यात आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अभिनंदनशी निगडीत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. लोकांनी अभिनंदनच्या नावाने अनेक हॅशटॅगचा वापर करण्यासही सुरुवात केली. पाकिस्तानकडून जाहीर करण्यात आलेला हा व्हिडिओ यूट्यूबवरही अपलोड करण्यात आला होता. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून हा व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. गृहमंत्रालयाकडून या व्हिडिओला हटवण्याची मागणी करण्यात आली होती. 

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांत ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून विमानांच्या सहाय्याने भारतावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभिनंदन यांच्या मिग-२१ या विमानाने प्रतिहल्ला करत पाकिस्तानचे एफ-१६ लढावू विमान जमीनदोस्त केले. परंतु हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले. तेव्हापासून अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात होते. अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरूवारी संसदेत अभिनंदन यांना शुक्रवारी सोडण्यात येण्याची घोषणा केली.