418 धोकादायक इमारतींना मनपाची नोटीस, 'या'त तुमची इमारत तर नाही ना?

सांगली शहर, मिरज आणि कुपवाड येथील 418 धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे

Updated: Jun 1, 2022, 10:38 AM IST
418 धोकादायक इमारतींना मनपाची नोटीस, 'या'त तुमची इमारत तर नाही ना? title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : पावसाळ्यात धोकादायक इमारती पडण्याची भीती अधिक असल्यामुळे या पार्श्वभूमीवर सांगली मनपाने उपाययोजनेला सुरुवात केली आहे. धोकादायक इमारतींमुळे होणाऱ्या आपत्तींना टाळण्यासाठी सांगली मनपाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. सांगली मनपाने सांगली शहर, मिरज आणि कुपवाड येथील 418 धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात 88 अतिधोकादायक तर 330 मध्यम आणि किरकोळ धोकादायक इमारतींचा समावेश आहे.  

आतापर्यंत महानगरपालिकेने सांगली शहरातील 1 तर आणि कुपवाडमधील 2 अतिधोकादायक इमारत पाडण्यात आली आहे. मिरज शहरातील 55 अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरु आहे. सांगली शहरातील गणपती पेठ, गावठाण भाग, दत्तनगर, वखारभाग, खणभाग, सांगलीवाडीत मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. या परिसरात 29 इमारती अतिधोकादायक तर 72 इमारती मध्यम आणि किरकोळ धोकादायकमध्ये समावेश करण्यात आला आहे. मध्यम आणि किरकोळ धोकादायक इमारतींना दुरुस्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. 
 

मिरजमध्ये गावठाण भागात जुन्या इमारतींची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये 55 इमारती अतिधोकादायक आहेत तर 243 इमारती मध्यम आणि किरकोळ धोकादायक आहेत. या परिसरातही मनपाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. मनपाने दिलेल्या मुदतीमध्ये इमारतींच्या मालकांनी पाऊल न उचलल्यास मनपाकडून धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.