मराठा आंदोलनात मोठा ट्विस्ट; गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका

मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात गेले आहेत. हिंसक आंदोलकांवर कारवाई करण्याची याचिका सदावर्ते यांनी केली आहे.

Updated: Nov 2, 2023, 04:16 PM IST
मराठा आंदोलनात मोठा ट्विस्ट; गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका title=

Gunratna Sadavarte : मराठा आंदोलनाचा वाद पुन्हा पेटला आहे. मराठा आंदोलना विरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते पुन्हा हायकोर्टात गेले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 8 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे येत्या काळात सदावर्ते विरुद्ध मराठा आंदोलक वाद पेटणय्चाी चिन्हे आहेत. 

आमदार बच्चू कडू यांचे मोठं विधान

अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आरक्षण मिळण्यास उशीर झाला असं मोठं विधान आमदार बच्चू कडू यांनी केलंय. मराठा नक्षलवादी नाहीत तेही सर्वसामान्य शेतकरी आहेत, त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं असं बच्चू कडूंनी म्हंटलंय. 

सरकारने आरक्षण न देता मराठा समाजाची केली फसवणूक 

राज्यातील मराठा आंदोलन तीव्र असतांनाच नाशिकच्या कळवण येथील कोल्हापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात येत आहे. मराठा आंदोलकाने राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छायाचित्रासह लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर फाडून आपला रोष व्यक्त केला. सरकारने आरक्षण न देता मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत मराठा बांधवांनी निषेध केला. 

मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मळगे गावच्या सरपंच नलिनी कृष्णा सोनाळे आणि त्याचे पती याची प्रकृती खालावली आहे. कागल तहसीलदार कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होत. पण या दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना कागल मधील ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आलंय.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आमदारांची उडी

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आता आमदारांनीही उडी घेतलीय. एकीकडे आमदारांनी सलग तिस-या दिवशी आंदोलन केलं तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांनीही विधान भवन परिसरात एका दिवसाचं आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांची भेट घेऊन विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. 

आरक्षणामध्ये कुणी आला तर त्याच्या नरडीचा घोट घेईन

मराठा समाजाला मिळणा-या आरक्षणामध्ये कुणी आला तर त्याच्या नरडीचा घोट घेईन असं धक्कादायक विधान आमदार संजय गायवाड यांनी केलंय. बुलढाण्यातील मोताळ्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय. मागच्या वेळी आरक्षण मिळालं त्यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी थयथयाट केला. मात्र आता हे सहन करणार नाही, जो कुणी आरक्षणाच्या आड येईल त्याचा जीव घेईन असं आ. संजय गायकवाड यांनी म्हंटलंय.