छत्रपती संभाजीनगरात मराठी गाण्याला आक्षेप, हॉटेलमध्ये दोघांनी डॉक्टरच्या कपाळावर रोखलं पिस्तूल

Doctor Beaten Over Playing Marathi Song: हॉटेलमध्ये मराठी गाणे लावले म्हणून डॉक्टरांवर पिस्तूल रोखल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 27, 2023, 05:59 PM IST
छत्रपती संभाजीनगरात मराठी गाण्याला आक्षेप, हॉटेलमध्ये दोघांनी डॉक्टरच्या कपाळावर रोखलं पिस्तूल  title=
a group of doctor beaten over playing marathi song in hotel 2 held

विशाल करोळे, झी मीडिया

छत्रपती संभाजीनगरः हॉटेलमध्ये मराठी गाणे (Marathi Song) लावले म्हणून एका डॉक्टराच्या कपाळावर पिस्तूल रोखून त्यांना जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणी ओळख पटवून दोघांना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा हायहोल्टेज ड्रामा घडला आहे. तर, या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV Video) झाला आहे. (Doctor Beaten Over Playing Marathi Song)

डॉक्टरांनी दिली तक्रार

हॉटेलमध्ये मराठी गाणं लावलं म्हणून त्याला विरोध करत दोन व्यवसायिकांनी पार्टी करत असलेल्या डॉक्टरांसोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर त्यातील एकाने पार्टी करणाऱ्या डॉक्टरांच्या कपाळावर पिस्तूल रोखले. त्यानंतर त्यांना जबर मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा प्रयत्न करणे या आरोपांतर्गत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

मराठी गाणी लावण्याची मागणी

हबीब अब्दुल शकूर आणि जगजीतसिंग सुरेंदरसिंग ओबेरॉय अशी दोघा आरोपींची नावं असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. दीपक फाटक हे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या चार मित्रांसह शहरातील आकाशवाणी नावाच्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला एक मराठी गाणं लावण्यास सांगितले. त्याचवेळी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या मॅक्स व जगजीतसिंग या दोघांनी त्यांना विरोध केला. तसंच, हे गाणं बंद करण्याची मागणी केली.

पिस्तूल रोखून धमकावले

मराठी गाणे का लावले? यावरुन दोन्ही आरोपींनी डॉक्टरांच्या मित्रांसोबत वाद घातला. त्यानंतर मॅक्सने पिस्तूल काढून डॉ. फाटक यांचे डॉक्टर मित्र एकनाथ पवार यांच्या डोक्याला लावली. त्यानंतर पिस्तूलची मूठ त्यांच्या डोक्यात मारली. तर त्यांच्यासोबत असलेल्या इतरांनादेखील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांनाही आता पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.