महाराष्ट्रातील छुपा किल्ला; कोकणातील गर्द झाडीत लपलेल्या पूर्णगड किल्ल्यावर आहे समुद्राकडे जाणारा चोर दरवाजा

Konkan Tour : गर्द वनराईतून सहज नजरेस पडणार नाही. मात्र, पूर्णगड गावातील नदी किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्यावर समुद्राकडे जाणार चोर दरवाजा आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 19, 2024, 06:15 PM IST
महाराष्ट्रातील छुपा किल्ला; कोकणातील गर्द झाडीत लपलेल्या पूर्णगड किल्ल्यावर आहे समुद्राकडे जाणारा चोर दरवाजा title=

Purnagad Fort : महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कोकणात असललेले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. प्रत्येक किल्ला हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. असाच एक छुपा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कोकणातील गर्द झाडीत पूर्णगड किल्ला दडलेला आहे. या किल्ल्यावर  समुद्राकडे जाणारा चोर दरवाजा आहे. 

कुठे आहे पूर्णगड किल्ला?

रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळील समुद्र किनारपट्टीलगत पूर्णगड हा किल्ला आहे.  पूर्णगड गावाजवळच हा किल्ला आहे. या गावाच्या नावावरुनच हा किल्ला ओळखला जाते. गावात प्रवेश केल्यावर गर्द झाडीत लपलेला हा किल्ला सहसा नजरेस पडत नाही. मात्र, समुद्रातून पाहिल्यास किल्ल्याची तटबंदी दिसून येते. पूर्णगड गावातून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूला मुचकुंदी नदीची खाडी आहे. तर पश्चिमेकडे सागरी किनारा आहे.

पूर्णगड किल्ल्याचा इतिहास

पूर्णगड किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून या किल्ल्याला  पूर्णगड असे नाव देण्यात आले असे सांगितले जाते. मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इ.सं. 1724 मधे पूर्णगड किल्ला बांधला असावा असे देखील इतिहासतज्ञ सांगतात. रत्नागिरी जिल्ह्यात खाड्यातून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा. सागरी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर असलेल्या टेकडीवर पूर्णगड किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याचा आकार पाहाता हा किल्ला टेहळणीसाठी बांधण्यात आला असावा अशी माहिती समोर येते.

समुद्राकडे जाणारा चोर दरवाजा

समुद्राकडे जाणारा चोर दरवाजा हे पूर्णगड किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे. पुर्णगड गावात प्रवेश केल्यावर अवघ्या 10 मिनिटात किल्ल्याचे प्रवेशव्दार दिसते.  प्रवेशव्दारा समोर हनुमानाचे मंदिर आहे. दोन बुरुजांच्या मध्ये हे मंदिर लपवलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला दोन देवड्या आहे. किल्यात प्रवेश केल्यावर समोरच एक मोठा चौथरा दिसतो. या चौथऱ्याच्या मागे किल्ल्याल्यावरुन थेट समुद्राच्या दिशेने बाहेर पडणारा चोर दरवाजा आहे. फक्त 15 मिनिटांमध्ये संपूर्ण किल्ला फिरुन होतो.

पूर्णगड किल्ल्यावर जायचे कसे?

जवळचे रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे.  रत्नागिरी शहरपासून पूर्णगड गाव 25 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी बस डेपोतून पूर्णगड गावात जाण्यासाठी थेट एसटीबसची व्यवस्था आहे. एसटी बसने किंवा खाजगी वहानाने पूर्णगड गावात जाता येते. गावात पोहचल्यावर पायऱ्यांच्या वाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ लागतो. किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची सोय नाही.