रायगड जिल्ह्यातील पावसाने नुकसान, शेतकऱ्यांचा मोर्चा

परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

Updated: Oct 28, 2019, 07:35 PM IST
रायगड जिल्ह्यातील पावसाने नुकसान, शेतकऱ्यांचा मोर्चा title=

अलिबाग : परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रकाशमय दिवाळी सण अंधारात ढकलला आहे. शेतीची नुकसान भरपाई शासनाने त्वरीत दयावी यासाठी म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. तसेच नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीच्या नुकसानेचे पंचनामे करण्यास सांगितले आहे.

म्हसळा तालुक्यात दोन हजार हेक्टर च्या भात, नाचनी आणि वरीच्या शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची सरसकट एकरी ३५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी म्हसळा ग्रामीण रुग्णालय ते तहसील कार्यालय मोर्चा काढला. यानंतर या शेतकऱ्यांनी दिवाळी सणातच शेतीचे नुकसान होऊन आपले दिवाळे निघाले असल्याची व्यथा मांडली. अद्याप नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत तहासिलदारांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देत झालेल्या नुकसानाचे  त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या क्यार वादळाने कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ऐन भातकापणीच्या वेळी पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. तळकोकणातल्या ९९८५ हेक्टर भातशेतीचे पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. यात २८ हजार ७६० शेतकऱ्यांचं नुकसान झाले. त्यामुळे कोकणातला शेतकरी रडकुंडीला आला आहे. सततच्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये तर पाणीच पाणी झाले. कोकणातील ४० टक्के भातपीक पूर्णपणे वाया गेले आहे. आता शेतामध्ये उरले सुरल पीक वाचवण्यासाठी कोकणातला शेतकरी हा धडपडत आहे.