अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा 'भाकरी'ची चर्चा! पण 'भाकरी फिरवणे'चा नेमका अर्थ काय?

Maharashtra Political Crisis Bhakri Firavne Meaning In Marathi: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर 'भाकरी फिरवणे' या विधानाची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. मात्र राजकीय परिस्थितीचा आणि भाकरीचा नेमका संबंध काय?

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 3, 2023, 12:34 PM IST
अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा 'भाकरी'ची चर्चा! पण 'भाकरी फिरवणे'चा नेमका अर्थ काय? title=
शरद पवारांनी सर्वात आधी भाकरी फिरवणेचा केला होता उल्लेख

Bhakri Firavne Meaning In Marathi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षातील काही नाराज आमदारांसहीत रविवारी (2 जुलै 2023 रोजी) राज्यातील सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ, अदिती तटकरे, धनंजय मुंडेसहीत 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'भाकरी फिरवणे' या विधानाची पुन्हा चर्चा होत असल्याचं दिसत आहे. 'राष्ट्रवादीची भाकरी करपली', 'भाकरी जळाली' यासारख्या प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या. मात्र राज्यातील या सत्तासंघर्षानंतर पुन्हा चर्चेत आलेल्या 'भाकरी फिरवणे'चा नेमका अर्थ तरी काय? भाकरीचा आणि राजकीय परिस्थितीचा नेमका काय संबंध आहे? यावरच प्रकाश टाकण्याचा केलेला हा प्रयत्न....

भाकरीचा संदर्भ काय?

योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सूचकपणे शरद पवार यांनी काही आठवड्यांपूर्वी केलं होतं. यानंतर शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी या निर्णयाला विरोध केल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं. त्यानंतर काही दिवसांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाचा पदभार सोपवण्यात आला. यावेळी अजित पवारांवर संघटनात्मक बांधणीसाठीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. सुप्रिया सुळेंना अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून अजित पवारांना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.

भाकरी फिरवणेचा अर्थ काय?

शहर विकास आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये 1972 ते 1995 दरम्यान कार्यरत असलेल्या अरुण नारायण सबनीस यांनी 13 जून रोजी यासंदर्भातील उत्तर 'क्वोरा'वर (Quora) दिलं असून हे उत्तर जवळपास 1 हजार वेळा वाचलं गेलं आहे. "भाकरी थापून ती तव्यावर टाकली जाते त्यानंतर ती तिच्या पृष्ठभागा कडून चांगली शेकली जाते परंतु जास्त वेळ तशीच राहू दिली तर ती करपते म्हणून एकदा पृष्ठभाग भाजून घेतला की तवा उचलून की डायरेक्ट ज्वालांवर शेकली तर फुगून येते आणि ती सर्व बाजूंनी न करता चांगली भाजण्यासाठी ती सतत उलट सुलट करून सर्व बाजूने चांगली शेकली जाते. अशा पद्धतीने भाकरी भाजली तरच ती गरम गरम भाकरी खायला खूप मजा येते. थोडक्यात भाकरी जशी सतत फिरवत राहिले म्हणजे चांगली शेकली जाते आणि खाण्याला अधिकाधिक चविष्ट बनत जाते, त्याचप्रमाणे कुठल्याही संस्थेत किंवा आस्थापनांमध्ये अनेक काळ चालू असलेल्या प्रथा परंपरा काम करणारी माणसे यांच्यात वेळोवेळी बदल घडवून आणले नाहीत तर संस्थेत सुद्धा साचलेपणा किंवा अनिष्ट परिणाम दिसू शकतात आणि ते संस्थेच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या दृष्टीने योग्य नसते म्हणून मधून मधून भाकरी फिरवावी लागते. म्हणजेच बदल हा विकासाच्या दृष्टीने घडवून आणावा लागतो. या विवेचनावरून भाकरी फिरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात आला असेलच. कोणत्याही व्यवस्थेतील कच्चेपणा, साचलेपणा दूर करायचा असेल तर काळाची गरज ओळखून आणि परिस्थितीवर नीट लक्ष ठेवून मधून मधून सारखे उचित असे बदल करत राहावे लागणे म्हणजे भाकरी फिरवणे," असं सबनीस यांनी 'भाकरी फिरवण्या'संदर्भातील स्पष्टीकरणामध्ये म्हटलं आहे.

"असंतोष वाढीस लागतो व भाकरी करपते"

तेजस्विनी लोहार यांनी 'क्वोरा'वर दिलेल्या उत्तरामध्ये, "भाकरी फिरवणे.. म्हणजे राजकीय पक्षातील सर्वांना योग्य वेळी समान संधी देणे! जेणेकरून एकाच माणसाने सत्ता गाजवली म्हणून पक्षांमध्ये काही काळानंतर असंतोष वाढीस लागणार नाही व बंडखोरी होणार नाही. ज्या पक्षात लोकशाही तत्वे पाळली जातात त्या पक्षात आपोआपच सर्वांना समान संधी मिळते! पण ज्या पक्षात घराणेशाही, हुकूमशाही असते तेथे काही काळानंतर असंतोष वाढीस लागतो व भाकरी करपते," असं म्हटलं आहे.

राजकीय घराणेशाहीच्या संदर्भात हे वाक्प्रचार वापरल्या गेल्यास...

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या उत्तरांमध्ये श्रीकांत परत्वार यांच्या उत्तराचाही समावेश आहे. 'क्वोरा'वर श्रीकांत यांनी 'भाकरी फिरवली'चं दिलेलं स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे:

"वाक्प्रचार आणि म्हणींचा अर्थ ज्या परिच्छेदात वापरले गेले आहे त्यानुसार काही वेळा बदलतो तर परिस्थिती आणि कुणी वाक्य म्हटले आहे यावरही बऱ्याच वेळा लक्षणार्थ अवलंबून असतो. भाकरी फिरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ शब्दशः घेतल्यास भाकर भाजत असताना दोन्ही बाजूंनी आणि सर्व कडा व पृष्ठभाग व्यवस्थित भाजला जावा यासाठी गरम तव्यावर हळूहळू सातत्याने फिरवत राहावे लागते. याचाच अर्थ असाही काढता येतो की जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्ती हळूहळू बदलत गेल्या पाहिजे जबाबदाऱ्या विविध व्यक्तींवर सोपविण्यात आल्या पाहिजे जेणेकरून संघातील, पक्षातील म्हणा किंवा सत्तेतील म्हणा लोक कार्यक्षम होतील, कार्य उत्तम प्रकारे पार पडेल. याचाच असाही अर्थ काढता येतो की विरोधी पक्षाला सत्ता सोपवावी सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली उतरवावे. जर एखाद्या पक्षासंदर्भात हा वाक्प्रचार वापरायचा झाल्यास पक्षातील जबाबदाऱ्या इतरांवर सोपवाव्या आजपर्यंत ज्यांनी या जबाबदाऱ्या पार पाडले आहेत त्यांनी मार्गदर्शन करावे. राजकीय घराणेशाहीच्या संदर्भात हे वाक्प्रचार वापरल्या गेल्यास उत्तरिधिकारी बदलावेत म्हणजेच एकाच घराण्यातील दुसऱ्या उत्तराधिकाऱ्याकडे सत्ता सोपवावी."