पितृछत्र हरवलेल्या 10 वर्षाच्या मुलाला महिंद्रांकडून अनोखी ऑफर; Video तुफान Viral

Anand Mahindra Offer To 10 Year Old Boy: आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आनंद महिंद्रांनी केवळ हा व्हिडीओ शेअर केला नाही तर या मुलाला एक ऑफरही दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 7, 2024, 12:56 PM IST
पितृछत्र हरवलेल्या 10 वर्षाच्या मुलाला महिंद्रांकडून अनोखी ऑफर; Video तुफान Viral title=
आनंद महिंद्रांची पोस्ट चर्चेचा विषय

Anand Mahindra Offer To 10 Year Old Boy: देशातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेले आनंद महिंद्रा हे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. उद्योग क्षेत्रातील यशाबरोबरच ते सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असल्याने तरुणांची कनेक्टेड आहेत. आनंद महिंद्रा त्यांच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन कधी सुविचार तर कधी रंजक व्हिडीओ शेअर करत असतात. अनेकदा ते सोशल मीडियावरुन गजरुंना मदतही देऊ करतात.  उद्योन्मुख खेळाडू असो किंवा खटपट करणारा नवउद्योजक असो आनंद महिंद्रा नेहमीच गरजू व्यक्तींना मदत करताना दिसतात. सध्या त्यांनी अशीच एक ऑफर एका चिमुकल्याला दिली आहे.

वय वर्ष 10

आनंद महिंद्रा खरं तर अनेकदा अशा पोस्ट करतात की लोक ते स्वत:शी रिलेट करुन पाहतात. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक चिमुकला मुलगा एग-चिकन रोल विकताना दिसत आहे. दिल्लीतील टिळक नगर परिसरामधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये हा मुलगा स्वत:चं वय 10 वर्ष असल्याचं सांगतो. हा व्हिडीओ संजय घोष यांनी शेअर केला आहे. व्हिडीओत दिसणारा चिमुकला पंजाबी असून तो पंजाबी भाषेतच संवाद साधताना दिसतोय. 

या मुलाने सांगितलं स्वत:च्या आयुष्यातील दु:ख

एवढ्या कमी वयामध्ये तुला एग आणि चिकन रोल बनवण्यास कोणी शिकवलं असं विचारलं असता तो, 'माझ्या वडिलांनी शिकवलं' असं उत्तर देतो. पुढे संवाद साधताना या मुलाचं नाव जसप्रित असल्याचं तो सांगतो. तसेच त्याला हे रोल बनवण्यास शिकवणाऱ्या त्याच्या वडिलांचं निधन झाल्याचंही तो सांगतो. हिरवा टी-शर्ट, गडद निळ्या रंगाच्या पगडीमधील या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मात्र आनंद महिंद्रांनी हा चिमुकला म्हणजे हिंमतीचं दुसरं नाव असल्याचं म्हटलं आहे.

आनंद महिंद्रांनी काय ऑफर दिली?

"हिंमतीचं दुसरं नाव जसप्रीत आहे. मात्र यामुळे त्याच्या शिक्षणावर परिणाम होता कामा नये," अशी इच्छा महिंद्रांनी व्यक्त केली आहे. "मला वाटतं हा दिल्लीतील टिळक नगरमधील व्हिडीओ आहे. कोणाकडे त्याचा कॉनटॅक्ट नंबर असेल तर तो शेअर करा प्लीज. महिंद्रा फाऊंडेशनची टीम त्याच्यासंदर्भात विचार करुन त्याच्या शिक्षणासाठी आम्ही कशी मदत करु शकतो याची चाचपणी करेल," असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे. 

अनेकांनी केलं आनंद महिंद्रांचं कौतुक

आनंद महिंद्रांनी शक्य त्या पद्धतीने या चिमुकल्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या या ऑफरसाठी त्यांचं कौतुक केलं आहे.