...तेव्हाच नितेशची साथ सोडेन, निलेश राणेंची प्रतिक्रिया

 राजकीय वर्तुळात राणे कुटुंबात असलेल्या मतभेदांवर चर्चा सुरु 

Updated: Oct 14, 2019, 11:58 AM IST
...तेव्हाच नितेशची साथ सोडेन, निलेश राणेंची प्रतिक्रिया title=

 प्रणव पोळेकर, झी मीडिया, कणकवली : नितेश आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाही. निलेश राणे मरेल त्याच वेळी नितेशची साथ सोडेल असे विधान माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. शिवसेनेबाबतच्या भूमिकेवरून नारायण राणेंच्या दोन्ही मुलांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं. पण नितेश राणेंचं हे वक्तव्य निलेश राणे यांना मान्य नाही. याबाबतचं एक ट्विट निलेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात राणे कुटुंबात असलेल्या मतभेदांवर चर्चा सुरु झाली. 

आमच्या राणे साहेबांवर टीका की तर आम्ही जशास तसे उत्तर देणार असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. ज्या दिवशी शिवसेना माघार घेईल त्याच वेळी आम्ही शांत राहणार याचा पुनरोच्चार त्यांनी केला. तुम्ही आमचा तिरस्कर करायचा आणि आम्ही तुम्हाला ओवाळायच का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राणेंनी शिवसेनेसोबतची कटुता संपवावी, असा सल्ला राणे कुटुंबाला दिला होता. यानंतर शिवसेनेवर टीका करणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळू, असं नितेश राणे म्हणाले होते.

कणकवलीमधून नितेश राणे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. तर याच मतदारसंघातून शिवसेनेनेही त्यांचा अधिकृत उमेदवार दिला आहे. नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेही शिवसेना उमेदवारासाठी घेणार आहेत. या सभेमध्ये आपण शिवसेनेवर टीका करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.