पन्नास हजारांसाठी गमावला लाखमोलाचा जीव... इंजिनियर तरुणाने थेट तलावात मारली उडी

Aurangabad Crime : पन्नास हजार रुपयांसाठी या तरुणाने लाख मोलाचा जीव गमावला आहे. ऑनलाईनमध्ये पैसे हरल्याच्या तणावाखाली हा उच्चशिक्षित तरुण होता. या तणावातून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि तलावात उडी घेतली.

आकाश नेटके | Updated: May 6, 2023, 11:59 AM IST
पन्नास हजारांसाठी गमावला लाखमोलाचा जीव... इंजिनियर तरुणाने थेट तलावात मारली उडी title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : भारतात सध्या तरुणाईला ऑनलाईन गेमचं (Online Game) वेड लागल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनलाईन गेमिंगच्या वेडपाई तरुणाई कोणत्याही थराला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यात आली आहे. काही चिनी (China) कंपन्यांच्या ऑनलाईन गेमवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही तरुणाईचे या ऑनलाईन गेमिंगचे वेड कमी होताना दिसत नाहीये. अशातच या ऑनलाईन गेमिंगपाई एका तरुणाने जीव गमावला आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने औरंगाबदच्या एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. उच्चशिक्षित असलेल्या या तरुणाने ऑनलाईन गेम खेळून 50 हजार रुपये गमावले होते. याचाच तरुणाच्या मनावर खोलवर परिणाम झाला. तणावात असलेल्या या तरुणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह तलावाबाहेर काढला.

गौरव चंद्रकांत पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 23 वर्षीय गौरव हा इंजिनियर असून त्याचे मेकॅनिकल डिप्लोमापर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. गौरवला मोबाईलमधल्या ऑनलाईन गेमचे वेड लागले होते. या वेडापाई त्याने ऑनलाईन गेममध्ये 50 हजार रुपये गमावले. पैसे गमावल्याच्या गौरवच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. या तणावात गौरवने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बचाव पथकाच्या मदतीने गौरवचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला आणि या घटनेची माहिती गौरवच्या कुटुंबियांना देण्यात आली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातावेईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेऊन टाहो फोडला. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. 

पैसे पाठव नाहीतर बहिणीचे अपहरण करु

दुसरीकडे, ऑनलाईन गेमिंगवरुन सायबर गुन्हेगारांनीसुद्धा लोकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये 11 वर्षीय मुलाला ऑनलाईन गेम खेळताना आईच्या खात्यातून एक लाख 2 हजार रुपये पाठव नाहीतर तुझ्या बहिणीचे अपहरण करु अशी धमकी दिली होती. घाबरुन या मुलाने सायबर गुन्हेगारांच्या खात्यात पैसे देखील पाठवले. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलाच्या आईने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलाने आईच्या मोबाईलवरून 20 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत 1 लाख 2 हजार रुपये आरोपींच्या खात्यात वळते केले आहेत.