लस न घेतलेल्यांना आणखी एक झटका, 'या' शिक्षेला तयार राहा

लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी नियम आणखी कठोर 

Updated: Dec 13, 2021, 08:46 PM IST
लस न घेतलेल्यांना आणखी एक झटका, 'या' शिक्षेला तयार राहा title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. एक लस घेऊन तारीख उलटूनही दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत त्यांनी 15 तारखेपर्यंत डोस न घेतल्यास 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

वसुल करण्यात आलेल्या दंडाची 50 टक्के रक्कम ही पोलीस प्रशासन आणि 50 टक्के रक्कम मनपा फंडात जमा करण्यात येणार आहे. 15 डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. 

लस नाही तर किराणा नाही, दारू नाही
याआधी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी औरंगाबादमध्ये पेट्रोल, गॅस, किराणा, कपडे खरेदीसाठी लसीकरण सक्तीचं करण्यात आलं होतं. तसंच लसीचा किमान एक डोस घेतल्याशिवाय दारू न देण्याचे निर्बंध लावण्यात आले होते. इतकंच नाही तर बारमध्ये बसूनही दारु पिता येणार नसल्याचे आदेश काढण्यात आले होते. 

केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाड्यात कोरोना लसीकरणाचा टक्का घसरलाय. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.