'सर म्हणाले शाळा बंद होणार, मग मलाही ऊस तोडायला जावं लागेल....' विद्यार्थ्याने मांडली कैफियत

ऊसतोडणी करणाऱ्या मजूराच्या मुलाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, चौथीच्या विद्यार्थ्याने मांडलं विदारक सत्य

Updated: Oct 18, 2022, 03:14 PM IST
'सर म्हणाले शाळा बंद होणार, मग मलाही ऊस तोडायला जावं लागेल....' विद्यार्थ्याने मांडली कैफियत title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : माझी शाळा (School) बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडावा लागेल, असं पत्र बीडमधल्या (Beed) एका विद्यार्थ्यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) लिहीलंय. 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्यास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनं (Student) हे पत्र लिहून आपली कैफियत मांडलीय. जर माझी शाळा बंद झाली तर मोठेपणी मीसुद्धा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जाईन असंही या विद्यार्थ्यांनं म्हटलंय. 

बीड जिल्ह्यातल्या समाधान जायभायेनं हे पत्र लिहिलंय. बीड जिल्ह्यातलं जायभायवाडी हे डोंगरांमधलं एक गाव आहे. गावात चौथीपर्यंत शाळा असल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येतं. पण पटसंख्या कमी असल्यानं ही शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली जातेय. जायभायवाडी इथल्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. आम्ही ऊसतोड कामगारांची असून इतर ठिकाणी शाळेत जाणे शक्य नसल्याचं विद्यार्थ्याने या पत्रात म्हटलंय. हे पत्र सोशल माध्यमात देखील व्हायरल झालंय 

राज्य शासनाचे शिक्षण विभागाने जिल्हा परीषदेच्या 20 पेक्षा कमी विद्यार्थी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून यांची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. शाळेच्या मुख्यध्यापकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायभायवाडी आता बंद होणार असं सांगितल्यानंतर शाळेतील समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्यांने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच पत्र लिहित आपल्या भावना मांडल्या. 

आपलं गाव जायभायवाडी डोंगर भागात असून इथं चौथीपर्यंत शिक्षण घेता येतं. गावातून इतर ठिकाणी जायचं म्हटलं तर पाच ते सात किलोमीटर चालत डोंगर चढ उतार करत जावं लागतं.  पावसाळ्यात जाणे येण्या साठी मोठा अडथळा होतो. आई वडील सहा महिने ऊस तोडणीला जातात अशा परीस्थीती मध्ये आम्ही शिकायचं कसं? आमची पिढी शिक्षणा पासून वंचित ठेवायची का? असा सवाल या विद्यार्थ्याने उपस्थित केला आहे.