Video : नातेवाईकांसह बोलण्यासाठी गाडी बाजूला घेतली अन्... भंडाऱ्यात पती पत्नीला ट्रकने चिरडलं

Bhandara News : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 28, 2023, 02:32 PM IST
Video : नातेवाईकांसह बोलण्यासाठी गाडी बाजूला घेतली अन्... भंडाऱ्यात पती पत्नीला ट्रकने चिरडलं  title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती- पत्नीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात (Bhandara News) समोर आला आहे. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रविवारी ही घटना असून या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर मोहाडी पोलिसात (Bhandara Police) अपघाताची नोंद करत पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

दुचाकीस्वार पती -पत्नी रस्त्याच्या बाजूला नातेवाईकांसोबत बोलत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या डब्लु सी एल कंपनीचा कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीस्वार पती -पत्नी जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर झाली आहे. तुमसर-मोहाडी राज्यमार्गवरील खरबी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर घडली आहे. 

भंडारा-तुमसर राज्यमार्गावरुन भंडाराहून कंपनीमध्ये कोळसा घेऊन हा ट्रक जात होता. यावेळी खरबी येथे महामार्गाच्या बाजूला दुचाकी थांबवून पती-पत्नी त्यांच्या नातेवाईक महिलेसोबत बोलत होते. यावेळी भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. मयत दुचाकी चालक हे रेल्वेमध्ये कार्यरत होते.

बालचंद ठोंबरे (55 रा.वरठी) वनिता ठोंबरे (50) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. तर नलु दामोधर बडवाईक (40 रा खरबी) असे जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून ट्रक चालकाने धडक दिल्याचा थरार कैद झाला आहे.

दरम्यान, या सगळ्या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमसर-मोहाडी येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच भंडारा येथील राज्य राखीव दलाचा चमू सुद्धा तिथे तैनात करण्यात आला होता.

पुलगाव-जालना राष्ट्रीय महामार्गवर केनवडजवळ खाजगी बसचा अपघात

वाशिम येथे पुसद वरून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बसला पुलगाव-जालना राष्ट्रीय महामार्गवरील वाशिम जिल्ह्यातील केनवड जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सवरील चालकांचा नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दहा ते बारा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.