भंडाऱ्यात जमिनीचा वाद जीवावर बेतला; पुतण्याने भररस्त्यात काकूची केली हत्या

Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यात पुतण्याने जमिनीच्या वादातून काकूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुना वाद उकरून काढत पुतण्याने रस्त्यातच काकूचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 7, 2023, 08:49 AM IST
भंडाऱ्यात जमिनीचा वाद जीवावर बेतला; पुतण्याने भररस्त्यात काकूची केली हत्या title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : शेतीच्या जुन्या वादातून डोक्यात सल ठेवून चुलत पुतण्याने वृद्ध काकूचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा (Bhandara Crime) जिल्ह्यात समोर आला आहे. शेतीचा जुना वाद इतका टोकाला पोहोचला होता की पुतण्याने काकूची थेट हत्याच केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Bhandara Police) घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर पोलिसांनी आरोपी पुतण्याला ताब्यात घेत अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक तपास करत आहेत.

देवलाबाई किसन गेडाम (55) राहणार गोंदीदेवरी तालुका लाखनी असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी स्वप्निल अभिमान गेडाम (31) राहणार किटाडी तालुका लाखनी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी स्वप्निल गेडामला अटक केली आहे. देवलाबाई गेडाम या रानभाज्या गोळा करण्याचे काम करायच्या. त्यांचा विवाह किटाडी इथल्या गेडाम परिवारात झाला होता. लग्नानंतर दोन ते तीन वर्षात पतीचे निधन झाल्याने देवलाबाई माहेरी गोंदीदेवरी येथे राहायला आल्या होत्या. परंतु सासरच्या सामूहिक जमिनीवर वारसा हक्काने देवलाबाई यांचेही नाव होते. त्यामुळे या जमिनीच्या हक्कदार होत्या. यावरुनच त्यांचा चुलत दीर अभिमान जयराम गेडाम यांच्यासोबत वाद होता. 

देवलाबाई यांना कोणतेही अपत्य नव्हते. तसेच त्यांना त्यांच्या सासरच्या चुलत परिवाराला जमिनीचा हक्क द्यायचा नव्हता. गेडाम परिवाराने याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे जमिनीच्या वादावर न्यायालयीन प्रक्रिया सुरु होता. मात्र अभिमान गेडाम यांचा मुलगा स्वप्निल याने जमिनीच्या वादातून रागाच्या भरात देवलाबाई यांची हत्या करुन टाकली.

आरोपी स्वप्निल हा अभिमन गेडामचा लहान मुलगा होय. तो अविवाहित होता. घटनेच्या दिवशी आरोपी स्वप्निलला जंगलात सात्या शोधताना देवलाबाई जंगलातील देवरी किटाडी रस्त्यावर दिसल्या होत्या. त्यावेळी आरोपी स्वप्निलने देवलाबाई यांना गाठलं आणि जुना शेतीचा वाद उकरून जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचवेळी स्वप्निलला राग अनावर झाला आणि त्याने देवलाबाई यांना कानाखाली दोन तीन चापटी मारल्या आणि बुक्क्या मारून जमिनीवर पाडले. त्यानंतर स्वप्निलने देवलाबाई यांचे नाक, तोंड आणि गळा दाबून त्यांच्या खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पालांदुर पोलिसांनी आरोपी स्वप्निलला अटक केली.