सोलापुरात मटका प्रकरणात मोठी कारवाई, भाजप नगरसेवकाला अटक

मटका प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फरार मटका किंगला महिनाभरानंतर अटक झाली.  

Updated: Sep 24, 2020, 07:12 PM IST
सोलापुरात मटका प्रकरणात मोठी कारवाई, भाजप नगरसेवकाला अटक  title=
प्रातिनिधिक फोटो

सोलापूर : मटका प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फरार मटका किंगला महिनाभरानंतर अटक झाली. हा मटका किंग भाजपचा नगरसेवक सुनील कामाटी आहे. त्याने तीन वर्षांत मटका व्यवसायातून ३०७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. याप्रकरणात २८८ जणांवर गुन्हे दाखल आहेत. ७० जणांना अटक करण्यात आली आहे. २४ ऑगस्टला पोलिसांनी धाड टाकली होती, पण त्यावेळी कामाटी फरार झाला होता. त्याला अखेर अटक करण्यात यश आले आहे. 

सोलापुरात महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या एका नगरसेवकासह जवळपास २८८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्यापैकी ७० जणांना अटक देखील कऱण्यात आली आहे. या मटका प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी भाजप नगरसेवक सुनील कामाटी याला एका महिन्यानंतर हैदराबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आता चौकशीतून अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

२४ ऑगस्ट सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या टीमला सोलापुरातील कुंची कोरवे गल्ली येथील एका इमारतीत मटका व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार गुन्हे शाखेने इमारतीवर धाड टाकली. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पळून जाताना एकाचा यामध्ये मृत्यू झाला होता. या कारवाईत पोलिसांनी घटनेच्या दिवशी ४० जणांवर गुन्हा दाखल करत २८ जणांना ताब्यात घेतले होते.

या घटनेचा तपास करत असताना आतापर्यंत याप्रकरणी २८८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शहरात मटका चालवणाऱ्यापैकी प्रमुख सूत्रधार हा भाजप नगरसेवक सुनील कामाटी असल्याचे पोलीस तपासात समोर आले. नगरसेवक सुनील कामाटी हा मात्र २४ ऑगस्टपासून फरार होता. अखेर बुधवारी २३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हैदराबाद येथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सुनील कामाटीच्या घरात आढळलेल्या मटक्यांच्या हिशोबाच्या डायरीमधून मागील तीन वर्षात तब्बल ३०७ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मटका प्रकरणात सोलापुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईपैकी आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्यांचे सांगितले जात आहे. मुख्य आरोपी सुनील कामाटी याची राजकीय कारकिर्द पाहता सुनील कामाटी याला आणखी कोणाकोणाचे पाठबळं होतं याचा शोध घेणं हा पोलिसांसमोर पुढचं आव्हान असणार आहे.