पंकजा मुंडेंचा वनवास संपला, लोकसभा निवडणुकीसाठी 'या' मतदारसंघातून उमेदवारी जाहीर

BJP Candidates List For Lok Sabha 2024: गेल्या पाच वर्षापासून वनवास सहन करणाऱ्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीड लोकसभेच्या जागेसाठी भाजपने उमेदवारी दिली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Mar 13, 2024, 09:13 PM IST
पंकजा मुंडेंचा वनवास संपला, लोकसभा निवडणुकीसाठी 'या' मतदारसंघातून उमेदवारी जाहीर title=
Pankaja Munde, Beed Lok Sabha constituency

Pankaja Munde BJP Candidates For Beed Lok Sabha constituency : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी (Maharashtra BJP Candidate List) आज जाहीर झाली. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागेवर उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा वापर केल्याचं पहायला मिळतंय. पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर रावेरघून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आलीये. त्याचबरोबर आता बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी दिली आहे. तर सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून निवडणूक लढवतील. त्याचबरोबर नितीन गडकरी यांनी नागपूरचा गड आपल्याकडेच राखला आहे. तर रावसाहेब दानवे जालण्यातून भाजपचा किल्ला लढवतील.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता.त्यानंतर पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळालं. मात्र, त्या खुश नसल्याचं बोललं जात होतं. विधानसभेसाठी धनंजय मुंडे परळीतून, बीड लोकसभेसाठी डॉ. प्रीतम मुंडे, तर शेवगाव-पाथर्डीतून पंकजा मुंडे असा हा अलिखित करार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

भाजपाकडून खासदार राहिलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना तिसऱ्यांदा भाजप लोकसभेच्या रणांगणात उतरवणार की पंकजा मुंडे यांना भाजप दिल्लीला पाठवणार? याची चर्चा बीडमध्ये सुरु होती. मात्र, आता भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीनंतर मराठवाड्याचं चित्र एकंदरीत स्पष्ट होताना दिसत आहे.

पंकजा मुंडे यांनी दिले होते संकेत

येत्या चार दिवसांत आचारसहिंता लागेल, त्यामुळे आता काय काळजी घ्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काळजी लोकसभेची घ्या, मग पुढची काळजी आम्ही घेऊ, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. अशातच आता त्यांचं नाव जाहीर झालं आहे.

महाराष्ट्र भाजपची यादी जाहीर

नंदुरबार - हिना गावित
धुळे - सुभाष भामरे
जळगाव - स्मिता वाघ
रावेर - रक्षा खडसे
अकोला - अनुप धोत्रे
वर्धा - रामदास तडस
नागपूर - नितीन गडकरी
चंद्रपूर - सुधीर मनगंटीवार
नांदेड - प्रतापराव चिखलीकर
जालना - रावसाहेब दानवे
दिंडोरी - भारती पवार
भिवंडी - कपिल पाटील
मुंबई उत्तर - पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व - मिहिर कोटेचा
पुणे - मुरलीधर मोहळ
अहमदनगर - सुजय विखे पाटील
लातूर - सुधाकर सुंगारे
बीड - पंकजा मुंडे
माढा - रणजित नाईक निंबाळकर
सांगली - संजय काका पाटील