पाडलं, फोडलं...तरी येणार भाजपच! महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फोडल्याचा फायदा होणार?

मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंदिंयांना फोडल्याचा फायदा भाजपला झाला. महाराष्ट्रात तर भाजपनं दोन मोठे प्रादेशिक पक्ष फोडलेत. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो का? जाणून घेवूया

Updated: Dec 3, 2023, 08:29 PM IST
पाडलं, फोडलं...तरी येणार भाजपच!  महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फोडल्याचा फायदा होणार? title=

Maharashtra politics :  भाजपनं फोडाफोडीच्या राजकारणाचा नवा ट्रेंड सेट केला. भाजपनं अमुक पक्ष फोडून सत्ता मिळवली. तमुक पक्ष फुटण्यामागे भाजपचं ऑपरेशन लोटस आहे.. अशी टीका-टीपणी आपण अनेकदा ऐकली आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपचं नुकसान होतंय असाही सूर राजकीय विश्लेषकांकडून उमटताना दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र काही वेगळीच आहे.

सरकार पाडलं, पक्ष फोडले, ऑपरेशन लोटस राबवलं तरी लोकांची पसंती भाजपलाच

सरकार पाडलं, पक्ष फोडले, ऑपरेशन लोटस राबवलं तरी लोकांची पसंती भाजपलाच आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निकालानं तर यावर शिक्कामोर्तब केलंय. 2018 मध्ये मध्यप्रदेश भाजपनं गमावलेलं होतं, कमलनाथ मुख्यमंत्री होते. मात्र, ज्योतिरादित्य सिंदिंयांना पक्षात घेत भाजपनं मध्यप्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार पाडलं. गोव्यातही भाजपनं काँग्रेसचे 10 आमदार गळाला लावले आणि सरकार स्थापन केलं. 

महाराष्ट्रात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 2 प्रादेशिक पक्ष फुटण्यामागे भाजपचीच महाशक्ती असल्याची टीका होत आलीय. मध्यप्रदेशमध्ये भाजपनं काँग्रेस फोडली, सिंदिंयाना फोडलं आणि सत्तेत आली. याच धर्तीवर महाराष्ट्रातही भाजप सत्तेत येईल, असा कयास बांधला जातोय. विशेषत मध्यप्रदेशात सिंदिंयांना काँग्रेसमधून फोडल्याचा फायदा भाजपला झाला तसाच फायदा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फोडल्याचा होऊ शकतो, असा अंदाज बांधला जातोय. अर्थात काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली.. सरकार पाडलं तरी जनतेच्या मनातलं भाजपचं स्थान आणि मोदींची जादू कायम आहे.

फोडाफोडीतून भाजप सत्तेत येते आणि लोकंही हे स्वीकारतात

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसमधून सिंदिंयांना फोडत भाजप सत्तेत आली. महाराष्ट्रात तर भाजपनं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलंय. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका होत असताना याच फोडाफोडीतून भाजप सत्तेत येते आणि लोकंही हे स्वीकारतात. हे नरेटीव्ह सेट होतंय. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ - अजित पवार

मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. तर या निवडणूक निकालाचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हंटलंय.
विजयामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला

तीन राज्यात मिळालेल्या यशानंतर आता महाराष्ट्रातही महायुतीला घवघवीत यश मिळेल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. राज्यात लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 225 हून अधिक जागा जिंकू असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय.