संजय राऊत यांना 'चमचा' निशाणी मिळावी; शिंदे गट निवडणूक आयोगाकडे मागणी करणार

संजय राऊत सारख्या लोकांना "चमचा " निशाणी द्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार.. खासदार प्रतापराव जाधव यांचं प्रत्युत्तर..

Updated: Dec 11, 2022, 07:49 PM IST
संजय राऊत यांना 'चमचा' निशाणी मिळावी; शिंदे गट निवडणूक आयोगाकडे मागणी करणार title=

बुलढाणा, झी मीडिया, मयुर निकम : शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते सातत्याने एकमेकांवर टीकेची झोड उडवत आहेत. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर वार पलटवार केले जात आहेत. सीमा प्रश्नावरून शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी शिंदे गटाच्या आमदार-खासदारांवर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाकडून देखील जशास तसे उत्तर देण्यात आले आहे.  शिंदे गटाचे  बुलढाणा येथील खासदार प्रतापराव जाधव (Buldhana MP Prataprao Jadhav) यांनी संजय राऊतांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले.

संजय राऊत यांनी सीमा प्रश्नावरून शिंदे गटाच्या आमदार-खासदारांना लक्ष्य केलं होतं. तोंडाला कुलूप लावून बसलेल्या या लोकांना कुलूप निशाणी द्यावी, असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना  बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी राऊतांना चमचा निशाणी मिळावी, अशी मागणी आपण करणार असल्याचं म्हंटल आहे.  संजय राऊत सारख्या लोकांना भविष्यात "चमचा " निशाणी मिळावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचा टोला शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लगवाला आहे.

सीमाप्रश्नी आमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी यासाठी आंदोलन केले. चाळीस दिवस ते जेलमध्ये राहिले. पोलिसांचे दांडे खाल्ले. मात्र, संजय राऊतांसारखे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चमचेगिरी करण्यात वेळ घालवत असल्याचा टोला प्रतापराव जाधव यांनी लगावला आहे.