भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम, पाहा स्पेशल रिपोर्ट

पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील चंद्रपुराचा खास करुन उल्लेख केला

Updated: Oct 29, 2017, 08:25 PM IST
भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम, पाहा स्पेशल रिपोर्ट title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया चंद्रपूर : चंद्रपूरच्या इको प्रो या युवा संघटनेनं येथील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली. पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील चंद्रपुराचा खास करुन उल्लेख केला. चंद्रपुरातील इकोलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनाईजेशन या एनजीओचं पंतप्रधानांनी कौतूक केलं आहे.

गेल्या २ महिन्यापासून चंद्रपूरातल्या या भुईकोट किल्ल्याची साफसफाई सुरु आहे. इको-प्रो या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या भुईकोट किल्ल्याचे ३८ बुरुज झाडून लख्ख स्वच्छ केलेत. ३०० वर्ष जुना आणि सुमारे ७ किलोमीटर लांबीचा हा भुईकोट किल्ला कधीकाळी चंद्रपूरची शान होता. मात्र, काळाच्या ओघात तो इतिहासजमा झाला.

दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची पडझड झाली. मात्र, चंद्रपुरातील इको-प्रो या युवकांच्या संस्थेनं पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ देत हा ऐतिहासिक वारसा लख्ख स्वरुपात पुढे आणण्याचा चंग बांधला. कार्यकर्त्यांच्या या मेहनतीमुळेच आज किल्ल्याला नवीन रूप मिळालय. ६२ दिवसांआधी दिसणारा परकोट आज अगदी थक्क करणा-या स्वरूपात लोकांपुढे आलाय.

पाठीशी कुठलंही आर्थिक बळ नाही. परकोटाच्या साहाय्यानं अतिक्रमण केलेल्या लोकांशी दोन हात करणे, साहित्याची कमतरता आणि शेवटी प्रचंड रिस्क अशा परिस्थितीत काम पुढे रेटलं. अगदी थोड्या मात्र जिगरबाज कार्यकर्त्यांच्या जोरावर इको-प्रो ही स्वच्छता मोहिम पुढे नेत आहे. आता फेसबुकवर या संघटनेच्या ६२ दिवसांच्या अथक कार्याच्या कथा वाचून युवा वर्ग स्वतःहून या कामात सहभागी होत आहेत.

हा भुईकोट किल्ला ताडोबाहून अधिक पर्यटक खेचून आणू शकतो याकडे आजवर दुर्लक्ष झाले. मात्र, इको-प्रोच्या माध्यमातून हा किल्ला पुन्हा प्रकाशात आलाय. त्यामुळे पर्यटकांची पावलं हळूहळू किल्ल्याकडे वळू लागलीत.

साडेसात कि. मी. परकोटाच्या स्वच्छतेसाठी अजून साधारण एक महिना लागणार आहे. हे वारसाप्रेम इथेच न थांबता किल्ल्याच्या संवर्धनाकडेही लक्ष दिलं जाणार आहे. त्यासाठी प्रसंगी जनआंदोलनाचा निर्धार इको-प्रो संघटनेने व्यक्त केला आहे.